निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यात सहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या सावत्र सासूच्या नावावरील जमीन स्वत:च्या पत्नीच्या नावाचा वापर करून हस्तांतरित करून घेण्याचा कथित प्रयत्न उघडकीस आल्याने महसूल विभागासह परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित जावयाविरोधात फसवणूक व शासनाची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील सर्व्हे क्रमांक २०६ मधील जमिनीसंदर्भात हौसाबाई चंदर सूर्यवंशी आणि उत्तम बाबुराव लासुने यांच्यातील वाद न्यायालयात प्रलंबित होता. संबंधित जमीन लिहून देणारी व्यक्ती मयत असल्याने खरेदीखताची प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नव्हते मात्र, याच परिस्थितीचा फायदा घेत उत्तम लासुने यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई उत्तम लासुने हिचे नाव ‘लक्ष्मीबाई चंदर सूर्यवंशी (फट्टे)’ असे दाखवून दोन्ही व्यक्ती एकच असल्याचा दावा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या ऑनलाईन फेरफार नोटिशीद्वारे ही बाब समोर आल्यानंतर सावत्र मेहुणे विष्णुकांत चंदर सूर्यवंशी यांनी तातडीने महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, त्यांची आई लक्ष्मीबाई चंदर सूर्यवंशी (फट्टे) यांच्या नावावरील गट क्रमांक २०६ मधील ०.३६ आर जमीन २० एप्रिल २०२६ रोजी खरेदीखत क्रमांक २९६३ अन्वये उत्तम बाबुराव लासुने, रा. हाडगा यांच्या नावे करण्यात आली.
तक्रारदाराचा आरोप आहे की, खरेदीखत करताना ‘लक्ष्मीबाई उत्तम लासुने ऊर्फ लक्ष्मीबाई चंदर सूर्यवंशी’ असे नाव वापरून संबंधित महिला मयत असल्याची बाब जाणीवपूर्वक लपविण्यात आली. तसेच न्यायालयाचा डिक्री आदेश आणि उपनिबंधक कार्यालयाची दिशाभूल करून स्वत:च्या मालकीची नसलेली जमीन खरेदीखताद्वारे हस्तांतरित करून घेण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांखाली कारवाई करण्याची मागणी विष्णुकांत चंदर सूर्यवंशी यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, चौकशीअंती सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. महसूल विभागाच्या भूमिकेमुळे संबंधित फेरफार नोंद सध्या रोखण्यात आली असून, पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
















