जालना : प्रतिनिधी
मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. शहरांमध्ये आलेल्या पावसामुळे धरणे भरली असून पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचे बोलले जाते. मात्र, अद्यापही शेतकरी पावसाची वाट पाहात असून मराठवाड्यातही हवा तेवढा पाऊस नसल्याने बळिराजा काळजीत होता. मात्र, मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून हवामान विमानानेही रेड अलर्ट जारी केला आहे. तर, विदर्भातही मुसळधार पाऊस सुरू असून काही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतक-यांची चिंता वाढली होती. मात्र, आज जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, अंबड, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून उघडिपीमुळे आलेला ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे विदर्भातही ३० आणि ३१ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भातील यवतमाळ, अमरावती, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे.
नांदेडला रेड अलर्ट
३० जुलै रोजी नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनीही सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
मेळघाटात २० गावांचा संपर्क तुटला
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात काल दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. येथील सिपना नदीला पूर आला असून, पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे २० ते २५ गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
भंडा-यात मुसळधार पावसाची हजेरी
हवामान विभागाने आज भंडा-याला ऑरेंज अलर्ट दिलेला असताना सकाळपासून कडक ऊन पलले होते. मात्र, दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. काळे ढग एकत्र आले आणि भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. तुमसरमध्ये तब्बल तासभर मुसळधार पावसाचे धूमशान होते.
गडचिरोलीत पुन्हा मुसळधार
मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तर आल्लापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून येथील पेट्रोल पंपालाही पाण्याने वेढा घातला आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
















