लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटीलयांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला लातूर शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्याने नेहमी गजबजणारे लातूर अक्षरश: ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजबांधव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवरायांचा जयजयकार तसेच मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहरात दुचाकी रॅली काढून शहरातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, आणि खासगी आस्थापनांनीही बंदला प्रतिसाद दिला. बंदची पूर्वकल्पना असल्याने शहरातील शाळा भरल्या नव्हत्या. रस्त्यांवर स्कूल बसही दिसल्या नाहीत. महाविद्यालयांमध्येही शुकशुकाट होता.
दरम्यान दुपारी समाजबांधव मोठ्या संख्येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुन्हा एकत्र आले व त्यांनी तेथे बैठक देत आपल्या भावनांना वाट करुन दिली. मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेकांना संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. पाल्यांचे शिक्षण, मुलींची लग्ने, वाढते कर्ज, नापिकी आणि व्यवस्थेकडून होणारी अडवणूक यामुळे समाज खचला आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. आता शासनाने अंत पाहू नये, अन्यथा समाजाचा संयम सुटेल व यापुढे मंत्री, लोकप्रतिनीधींच्या घरासमोरही आंदोलने होतील, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
दरम्यान बंद शांततेत पार पडावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. पोलिस प्रशासनानेही शहरभर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि शहर उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पीएसआय नागरगोजे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते.
















