मुंबई : शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा पहिलीपासून शिकविण्याच्या निर्णय घेणा-या महायुती सरकारवर कडाडून टीका केली. ५ जुलैला विजयी मेळावा होणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. बदललेल्या राजकीय वातावारणाचे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पडसाद पाहायला मिळाले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या पत्रकार परिषदेनंतर आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काल महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोप-यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला. शिवसेनेसोबत ज्या-ज्या राजकीय पक्षांनी, मराठी भाषिकांनी मतभेद विसरून पाठिंबा दिला, त्यांना मी धन्यवाद देतो.
सरकारला शहाणपण सुचतं की नाही, हे येत्या काही दिवसात कळेल. पण, तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला आहे. तो त्यांनी रद्द केला नसता तर, मराठी माणसाची झालेली एकजूट पाच तारखेच्या मोर्चात दिसली असती. हीच एकजूट आतादेखील दिसून येणार आहे. पाच तारखेच्या मोर्चात भाजपामधील आणि एकनाथ शिंदे गटातले अनेक मराठीप्रेमी येणार होते. त्यावरून भाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असते, हे दिसले असते.
आपण आता एकजूट झालो आहोत- पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारने आता एक नवीन समिती नेमली आहे. त्या समितीत नरेंद्र जाधव यांचा समावेश आहे. हा शिक्षणाच्या भाषेचा विषय आहे. सरकारनं आता तरी थट्टा करू नये. तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमली आहे. समिती कोणतीही असू दे. आता सक्तीचा विषय संपलेला आहे. महाराष्ट्रावर कोणतीही सक्ती होऊ शकत नाही. हे मराठी माणसाच्या शक्तीनं दाखवून दिलं आहे. पाच तारखेला विजय मेळावा होईल. हा मेळावा कुठे होईल दोन दिवसात जाहीर होईल.
हे सरकारचे षडयंत्र आहे
आम्ही पाच तारखेला विजय उत्सव साजरा करणारच. आम्ही सर्वांशी बोलत आहोत. तीच एकजूट विजय उत्सवात दाखवण्याची आवश्यकता आहे. पहिले मराठी विरुद्ध अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. हे सरकारचं षडयंत्र आहे. मराठी माणसात वाद होत नाही. हे दिसल्यानंतर मराठी एकजूट होऊ नये, म्हणून त्यांनी हा जीआर मागं घेतला आहे. मार्क मिळाले १०० पैकी १०० कमळी आमची एक नंबर! ही कमळी कोणत्या शाळेत शिकली हे बघायला हवं. कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती, हेदेखील पाहायला हवं की तिथेही ईव्हीएम मशीनचा वापर केला? हे पाहायला हवं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली केली आहे.
पाच जुलै रोजी विजय रॅली
त्रिभाषा सुत्राचा शासन निर्णय मागे घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान जाहीर केलं. त्यामुळे पाच जुलै रोजी होणारा सर्वपक्षीय मोर्चा टाळला असला तरी पाच जुलै रोजी विजय रॅली निघेल, असे उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री येथे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील विजयी मेळावा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे रॅलीत शिवसेनेबरोबर (यूबीटी) मनसे सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपने खोटेपणा पसरवला
भाजपाकडून खोटेपणा पसरविला जात असल्याचा ठाकरेंचा आरोप- त्रिभाषेचा निर्णय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, “मुख्यमंत्रीपदाच्या काळात नवीन शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर एक अभ्यास गट नियुक्त केला. पण, त्या अभ्यास गटाची एकही बैठक झाली नाही. पण त्यानंतर सरकार पडलं. त्यामुळेच भाजपाकडून खोटेपणा पसरवला जात आहे.”