विदर्भ-मुंबईतील काही जागांचा निर्णय बाकी
– २० ला काँग्रेसची पहिली यादी
मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून २८८ पैकी २६० जागांचा निर्णय झाला आहे. विदर्भ व मुंबईतील काही जागांचा निर्णय व्हायचा असला तरी २ दिवसांत निर्णय होऊन संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २० तारखेला काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, असे सांगितले. दरम्यान, ठाकरे गटानेही आज मातोश्रीवर विद्यमान आमदारांची बैठक घेतली. त्यामुळे लवकरच ठाकरे गटही उमेदवारांची यादी जाहीर करू शकतो.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून मंगळवारपासून उमेदवारीवर अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चा येत्या २ दिवसांत पूर्ण कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांच्यासह मविआचे इतर महत्त्वाचे नेते यासाठी उपस्थित होते. यापूर्वी २१६ जागांबाबत आघाडीत निर्णय झाला होता. आज आणखी ४४ जागांचा निर्णय झाला. त्यामुळे २८८ पैकी २६० जागांबाबत आतापर्यंत निर्णय झाला. उर्वरित जागांबाबतचा निर्णय आता पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर हा निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे नेते आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २० तारखेला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. आमची मित्रपक्षांसोबतही चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत सर्व जागांचे वाटप निश्चित होईल. दरम्यान, कॉंग्रेस पक्ष २० तारखेला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल, असे वडेट्टीवार म्हणाले.
ठाकरेंनी आमदारांना
दिले एबी फॉर्म?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. आजच्या बैठकीत विद्यमान आमदारांना एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला असून २२ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. .