मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत ‘न भूतो न भविष्यति’ असा महायुतीचा निकाल लागला आहे. भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत यांनी मविआच्या पराभवाचे खापर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर फोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. प्रतिष्ठेची लढाई म्हणून ओळखली जात असलेली यंदाची निवडणूक महायुतीने एका बाजूने जिंकली आहे. महायुतीच्या या विजयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही झाले त्याला सर्वस्वी धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी २३४ जागा मिळवून महायुतीने नवा विक्रम रचला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.
खासदार संजय राऊत म्हणाले, निकाल आधीच ठरला होता फक्न मतदान करून घेतले, मतदान होऊ दिले. तसेच जे काही घडले त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राऊत म्हणाले की, धनंजय चंद्रचूड यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदलले असते. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत. आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारू शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली. जी काही दुर्घटना महाराष्ट्रात झाली त्याला न्या. चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल, अशी गंभीर टीका संजय राऊत यांनी केली आहे.