मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटप चर्चा जवळपास पूर्ण झाल्या आहेत. महाविकास आघाडीत २८८ जागांपैकी २२० जागांवरील चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ६८ जागांवर अजून चर्चा बाकी असून येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा पूर्ण होणार आहे. ६८ जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. आज आचारसंहिता लागणार असून दोन दिवसांत उमेदवारांची यादी काँग्रेस पक्ष जाहीर करणार आहे. उद्यापासून उमेदवारांची छाननी समितीची बैठक होणार आहे. उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेस पक्ष आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीत उमेदवारांबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
यावेळची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक खूपच रंजक असणार आहे. वास्तविक, दोन गटांत फूट पडल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. उद्धव गटाची शिवसेना आणि शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अंतर्गत निवडणूक लढवणार आहे, तर शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुती आघाडीत निवडणूक लढवणार आहेत.
मविआचे सरकार आणायचे आहे
दरम्यान, हडपसर मतदारसंघाच्या दाव्याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, दावा कुणीही करू शकतो. सगळे पक्ष तयारी करत असतात. यात गैर नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती आहे. सगळे नेते एकत्र येत निर्णय घेतील. एकूण ६५ मतदारसंघांत आम्ही फिरलो आहोत. यात्रेच्या माध्यमातून लोकांनी ठरवलं आहे की महायुतीला घालवून महविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे.