नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची स्टारलिंक इंटरनेट सेवा लवकरच भारतात सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. एअरटेल आणि जिओने यासंदर्भात करारही केला आहे. दरम्यान, आता मस्क यांना मोठा झटका बसला आहे. भारताच्या दूरसंचार नियामक ट्रायने सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रमबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ट्रायने शिफारस केली आहे की, सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप फक्त ५ वर्षांसाठी केले जावे, जेणेकरुन सुरुवातीचा बाजारातील प्रतिसाद समजण्यास मदत होईल. हा निर्णय इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीच्या प्रस्तावाच्या विरोधात आहे. कंपनीने २० वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटपाची मागणी केली आहे. त्यामुळेच आता काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे आहे.
दरम्यान, इलॉन मस्क आणि भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी भागीदारी केली आहे. अंबानींच्या रिलायन्स स्टोअरमध्ये स्टारलिंक उपकरणे विकली जातील. यामुळे स्टारलिंक वितरणाला मोठ्या प्रमाणावर प्रवेश मिळेल. मात्र, स्पेक्ट्रमबाबतही दोन्ही कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. रिलायन्सने केवळ ३ वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटप करण्याची मागणी केली होती, तर स्टारलिंकला २० वर्षांसाठी परमिट हवे होते.
एअरटेलने देखील स्पेक्ट्रम परवाना फक्त ३-५ वर्षांसाठी देण्याची शिफारस केली. एअरटेलनेही रिलायन्सप्रमाणेच स्टारलिंकसोबत वितरण करार केला आहे. ट्राय ५ वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटपाची मागणी मान्य करणार आहे, जेणेकरून हे क्षेत्र कसे वाढते हे समजू शकेल.
सुधारणा करण्याची संधी
उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ वर्षांच्या अल्प कालावधीमुळे सरकारला बाजाराच्या विकासासह स्पेक्ट्रमच्या किमतींमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. ट्रायच्या शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी सुमारे एक महिना लागेल, त्यानंतर त्या दूरसंचार मंत्रालयाकडे पाठवल्या जातील.