26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeपरभणीमस्साजोग प्रकरणी जिंतूर, पूर्णा शहरात कडकडीत बंद

मस्साजोग प्रकरणी जिंतूर, पूर्णा शहरात कडकडीत बंद

जिंतूर/ पूर्णा : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेक-यांना फाशीची शिक्षा द्यावी. याशिवाय सहआरोपीची पुरवणी आरोप पत्रामध्ये नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी शनिवार, दि.८ मार्च रोजी जिंतूर व पूर्णा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. व्यापा-यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळाला.

मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे पोलीस, काही दोषी राजकीय नेते यांनाही सहआरोपी करत पुरवणी आरोपत्रात त्यांची नावे घेवून इतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मानवतावादी नागरिकांनी एकत्र येत शहर कडकडीत बंद केले. यावेळी व्यापा-यांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला. आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य केले आहे. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणा-या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्यावी व यास जबाबदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे या मागणीसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दि.८ मार्च रोजी पूर्णा शहर बंद पुकारण्यात आला होता. यास व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळ पासूनच व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवली. बंद दरम्यान शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, औषधी दुकाने आदीं सेवा सुरू होत्या. सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच संतोष देशमुख अमर रहे, खुनाच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना आरोपी करावे अशा घोषणासह आरोपींच्या निषेधार्थ घोषणा देत पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी मराठा समाज बांधव व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विलास गोबाडे व सहकारी पोलीसांच्या वतीने शहरातील झिरो टिपॉईंट, आनंदनगर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह शहरात जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR