लातूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना व इतर सर्व आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आभा कार्ड वितरण आणि गडकिल्ले स्वच्छता या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पंचसूत्री विशेष पंधरवडा राबविला जाणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी या कालावधीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, नगरविकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त मंगेश शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. कलमे, डॉ. बालाजी गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर सर्व आवास योजनेतून जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष पंधरवडा कालावधीत पाठपुरावा होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि शहरी भागात महानगरपालिका व नगरविकास विभागाने १५ दिवसांचा कृती आराखडा तयार करावा. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना द्याव्यात. तसेच प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा नियमित आढावा घ्यावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
जल जीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करणे, जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची स्वच्छता करून त्याठिकाणी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत विशेष प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जल जीवन मिशनसह इतर योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.