मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध
निलंगा : प्रतिनिधी
देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईविरोधात तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने निलंगा येथे गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोल पंप परिसरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नागरिकांना ‘मेलोडी’ चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारचा निषेध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या ‘मेलोडी’ रिलच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांची थट्टा करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि युवकांचे जीवन कठीण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश लहू म्हेत्रे, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, प्रशांत वांजरवाडे, बालाजी सूर्यवंशी, किशोर पाटील, सतीश रुपनर, बाळू दिगंबरे, पंकज क्षीरसागर, मास शिंदे, सूरज पेठकर यांच्यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
















