33.2 C
Latur
Monday, June 3, 2024
Homeसंपादकीय विशेषमहात्मा गांधींना अभिप्रेत ‘रामराज्य’

महात्मा गांधींना अभिप्रेत ‘रामराज्य’

आज ३० जानेवारी महात्मा गांधी यांची ७६ वी पुण्यतिथी. भारतात हा दिवस ‘‘शहीद दिन’’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या आठवड्यात आयोध्यात राममंदिर सोहळा संपन्न झाला. आणि देशात पुन्हा एकदा राम, रामायण आणि रामराज्याच्या विचार मंथनला सुरूवात झाली. भारतात विसाव्या शतकात राम आणि रामराज्याचा विचार मांडणारे महात्मा गांधी हे राजकीय नेते, अराज्यवादी व आदर्शवादी राजकीय विचारवंत होते. आजच्या या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींचे ‘‘रामराज्य’’ संबंधीचे विचार जाणून घेणे महत्वाचे वाटते. महात्मा गांधीजींना अभिप्रेत ‘‘स्वराज्य’’ तथा ‘‘आदर्श राज्य’’ हे ‘‘रामराज्य’’ आहे. ‘‘रामराज्य’’ हे वर्गविरहीत आणि समताधिष्टीत असेल. गांधीजींनी ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात, ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ या नियतकालिकांत रामराज्यासंबंधी त्यांनी विचार मांडले आहेत. रामराज्यात प्रजेला महत्वाचे स्थान असून ते नीती व मर्यादेवर आधारीत आहे, या राज्यात अभिव्यक्तीचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे, तसेच प्रेम आणि सद्भावना हा ‘‘रामराज्याचा’’ पाया असेल. अस्पृश्यता, मद्यप्राशन या गोष्टीला थारा असणार नाही. ही अपेक्षा गांधीजीनी व्यक्त केली होती. १९२९ मध्ये ‘‘यंग इंण्डियात’’ महात्मा गांधींनी ‘‘रामराज्य’’ विषयी स्पष्ट केले की, ‘‘राम राज्याचा अर्थ हिंदू राज्य नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ ईश्वरीय राज्य भगवानाचे राज्य, माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीवर असतील अथवा नसतील रामराज्याचा प्राचीन आदर्श नि:संदेह एक खरे लोकतंत्र आहे.

ज्यात गरिबांतील गरीब नागरीकांना न्याय मिळाला पाहिजे.’’ २ ऑगस्ट, १९३४ च्या आनंद बाजार पत्रिका मध्ये गांधीजी लिहितात, ‘‘माझ्या स्वप्नातील रामायणात राजपुत्र आणि रंक या दोघांनाही समान अधिकारांची खात्री दिली जाते.’’ १ जून, १९४७ रोजी गांधीजींनी ‘हरिजन’ मध्ये लिहिले, ‘‘ऐश्वर्यात लोळणारे काही लोक आणि पुरेसे अन्नही न मिळणारे सामान्य नागरिक अशा अन्यायकारक असमानतेच्या काळात रामराज्य अस्तित्वात येणे शक्य नाही.’’ ते पुढे म्हणतात, ‘‘ही पृथ्वी परमेश्वराची आहे, हे इथे राहणारे सर्व मानव एक आहेत. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण आणि समानतेने सुखी व्हावे, हे माझ्या स्वप्नातील रामराज्य आहे’’, ‘‘हे गरीब माणसाचे स्वराज्य आहे. श्रीमंतांना ज्या सुखसोयी उपभोगता येतात, त्या सुखसोयी गरीब जनतेला सुद्धा उपभोगता आल्या पाहिजेत. याचा अर्थ त्यांनीही राजवाड्यात राहावे असा होत नाही. पण प्रत्येक व्यक्तीला सर्वसामान्य सुखसोयींचा लाभ झाला पाहिजे. तो होईल तेव्हाच संपूर्ण स्वराज्य लाभले’’ असे मी म्हणेन.

रामराज्यातील कायदे म्हणजे नैतिक नियम असतील, नागरिकांना उपासनेचे, विचारांचे आणि लेखनाचे स्वातंत्र्य असेल, खेडे समृद्ध, सुखी आणि स्वयंपूर्ण असतील. सत्य आणि अहिंसा हा राज्याचा पाया असेल, ज्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला निर्भयतेने आणि स्वतंत्रपणे राहता येईल, महात्मा गांधीजीनी खेडेगांव हे केंदबिंदू मानले. कारण गांधीजींच्या मते, ‘‘खरा भारत हा शहरात नसून खेड्यात आहे. खेड्यांना जास्तीत जास्त स्वायत्ता मिळावी. खेड्यांचा कारभार लोकांनी निवडून दिलेल्या पंचायतीमार्फत चालवावा. खेड्यांनी आपल्या जिल्ह्याचा कारभार चालविणारी जिल्हा मंडळे निवडावीत. जिल्हा मंडळांनी प्रांतिक मंडळे, प्रांतिक मंडळांनी मध्यवर्ती मंडळ व त्याचा अध्यक्ष निवडावा अशी शासनव्यवस्था त्यांनी सुचविली.’’ खेड्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य असेल. त्यांना पूर्णत: अधिकार असतील, सहकार आणि ग्रामपंचायतीच्या सहाय्याने राज्यकारभार चालविण्यात येईल.

निवडणुकीसाठी उभे राहणारे उमेदवार हे निस्वार्थी भ्रष्टाचारापासुन मुक्त, चारित्र्यसंपन्न, सेवावृत्तीचे असावेत असा गांधीजींचा आग्रह होता. ‘‘आपण सुसंस्कृत झाल्याशिवाय आपले स्वराज्य निरर्थक आहे. महात्मा गांधीजींवर राम आणि रामराज्याचा प्रभाव शेवटच्या क्षणापर्यंत होता. ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात लिहितात, लहानपणी भीती वाटलीकी ते राम नामाचा जप करत, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ‘मिशन टू मॉस्को’ आणि ‘राम राज्य’ (१९४४ मध्ये) हे केवळ दोनच चित्रपट पाहिले होते, ३० जानेवारी, १९४८ रोजी दिल्लीत मृत्यू समयी ‘ हे राम’ असे म्हटले तर नवी दिल्लीतल्या यमुना नदीच्या तीरावर राजघाट या समाधीस्थळी स्मृतिप्रीत्यर्थ आजही ‘‘रघुपती राघव राजा राम’’ हे त्यांचे आवडते भजन गायले जाते.

– डॉ. प्रकाश खेत्री, मो.न. ७८४३० ९२२४४

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR