मान्सूनच्या आगमनानंतर सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत दरवर्षी ईशान्येकडील आसाम, मणिपूर या राज्यांमध्ये पुराचे थैमान दिसून येते आणि लाखो लोक या महापुरामुळे बाधित होतात. यंदाही सुमारे २० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पुराचे पाणी आल्याने आतापर्यंत १७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
साम आणि मणिपूर येथे मुसळधार पावसामुळे महापूर आला असून राज्यातील जनजीवन कोलमडून पडले आहे. आतापर्यंत किमान ५० जणांचा मृत्यू झाला असून काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यातील पुराची स्थिती गंभीर झाली आहे. प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत असून बचाव पथक युद्धपातळीवर काम करीत आहे. ईशान्य भारतातील महापूर ही एक गंभीर समस्या असून त्यावर कायमस्वरुपी तोडगा नसला तरी कमीत कमी नुकसान होण्यासाठी प्रभावीपणे उपाय करायला हवेत.
आसाम आणि मणिपूर येथील सुमारे २० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पुराचे पाणी आल्याने आतापर्यंत १७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. शंभराहून अधिक प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यावर हवामान खात्याने दोन्ही राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून त्यामुळे स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी राजधानी गुवाहटी लगतच्या भागाची पाहणी केली. आसाम आणि मणिपूर या दोन्ही राज्यांत बचाव कार्य करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकांसह लष्कर आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनादेखील पाचारण करण्यात आले आहे. पुरामुळे दोन्ही राज्यांतील रस्ते आणि अनेक पुलांची मोठी हानी झाली आहे. आसाममध्ये वर्षभरात किमान ३ वेळेस महापुर येतो. पूर्वी असे घडत नव्हते. तज्ज्ञांच्या मते, १९६० च्या भूकंपामुळे ब्रह्मपुत्रा नदीचा मार्ग बदलला आणि त्याची खोलीदेखील कमी झाली.
त्यानंतर हळूहळू पुराची समस्या गंभीर होऊ लागली. गेल्या एक दशकात त्याचे गांभीर्य आणखी वेगाने वाढले. यासाठी पर्यावरणाचा होणारा प्रचंड -हास, हवामान बदल अणि मानवी कृत्यांनादेखील महापूर येण्यास कारणीभूत ठरविले जात आहे. आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, महापुरामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांत २८०० गावातील १६.२५ लाख लोकांना फटका बसला. त्यात नागाँव, दरंग आणि करीमगंज जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सरकारने पूरग्रस्त भागात ५१५ मदत छावण्या उभारल्या आहेत. त्यात सुमारे ३.८६ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. काझीरंगा पार्कला फटका : काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दरवर्षी महापुरामुळे असंख्य प्राण्यांचा मृत्यू होतो. राज्यातील गोलाघाट आणि नागाँव जिल्ह्यांत पसरलेल्या अभयारण्याचा सुमारे ७५ टक्के भाग पाण्याखाली गेला आहे आणि २० हून अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. अर्थात जागतिक वारसा म्हणून समजल्या जाणा-या या पार्कची जैवविविधता आणि चारा वैरण वाचविण्यासाठी महापूर काही प्रमाणात उपयुक्त आहे.
कारण हे पूर आपल्या समवेत सुपीक माती घेऊन येतात. पूर्वीच्या काळातील महापूर विनाशकारी नसायचे आणि नियमितही येत नव्हते मात्र गेल्या काही वर्षांत महापुरांमुळे पार्कची आणि या ठिकाणी असणा-या प्राण्यांची मोठी हानी होत आहे. एकशिंगी गेंड्यांच्या जगातील एकूण संख्येपैकी एक तृतियांश संख्या काझीरंगात आढळून येतेष पण महापुरामुळे गेंड्यांचे जीवन धोक्यात येत आहे. महापुरामुळे शेकडो प्राण्यांनी उंच ठिकाणी आश्रय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग संख्या ३५ देखील अभयारण्यातून जातो आणि पाण्यापासून वाचण्यासाठी प्राणीदेखील याच मार्गावरून जातात. परिणामी काही वेळा वेगाने असलेल्या वाहनांच्या धडकेने त्यांचा मृत्यू होतो किंवा गंभीर जखमी होतात त्यामुळे सरकारने या ठिकाणाहून जाणणा-या वाहनांची गती २० ते ४० किलो मीटर प्रती तास ठेवण्याचा सल्ला दिला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कचे फिल्ड डायरेक्टर सोनाली घोष यांनी म्हटले, पार्कमध्ये पुराची स्थिती गंभीर आहे. या ठिकाणचे २३३ पैकी १४१ फॉरेस्ट कॅम्प पाण्याखाली आहेत.
मणिपूरमध्येदेखील सातत्याने पाऊस पडत आहे त्यामुळे प्रमुख नद्या इम्फाळ आणि कोंग्बाचे नदीकाठ भेगाळले आहेत. या कारणांमुळे इम्फाळ ईस्ट आणि इम्फाळ वेस्ट जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले. यात राजधानी इम्फाळचादेखील समावेश आहे. पावसामुळे सरकारने राज्यातील अनेक शाळा बंद केल्या. सरकारने प्रारंभी शाळा ४ जुलैपर्यंत बंद केल्या मात्र स्थिती गंभीर राहात असल्याने सुट्या वाढविण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने ४ जुलै रोजी सलग दुस-या दिवशी सरकारी सुटी जाहीर केली. सततच्या पावसामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. या ठिकाणी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांना मदत कार्यासाठी सोबत घेतले आहे. गेल्या वर्षी हिंसाचारानंतर मदत छावण्यात राहणा-या हजारो नागरिकांना आताचा महापूर हा नवे संकट म्हणून समोर आले आहे. पूरग्रस्त भागातील सुमारे २ हजार नागरिकांना मोटारबोटच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. लष्कर आणि सुरक्षा दलाचे जवान पूरग्रस्त भागात नागरिकांना भोजन आणि पिण्याचे पाणी पोहोचवत आहेत.
जंगलतोड कारणीभूत
मणिपूरच्या जलसंधारण, मदतकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री अवांग्बो नेमाई यांच्या मते, मणिपूरची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बेसुमार जंगलतोड आणि अफूच्या शेतीबरोबरच नदी काठावरचे वाढते अतिक्रमण हे महापुरासाठी महत्त्वाचे कारण ठरत आहे. दरवर्षी सरासरी ४२० चौरस किलो मीटर वन क्षेत्र नष्ट होत आहे. आगामी १०-१५ वर्षे अशीच स्थिती राहिली तर निसर्ग आणि पर्यावरण संतुलन ढासळणे स्वाभाविक आहे. मणिपूरचे तज्ज्ञ डी. के. नीपामाचा सिंह म्हणतात, महापुरावर अंकुश ठेवण्यासाठी व्यापक उपाय करणे गरजेचे आहे.
धरणे, बंधा-यांची निर्मिती हवी
तज्ज्ञांच्या मते, आसाम सरकारने गेल्या ६ दशकांत ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर तटबंदी उभारण्यासाठी सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्च केले मात्र गेल्या १० वर्षांपासून या नदीच्या काठावर मानवी वस्ती वाढू लागल्याने आणि जंगलतोड तसेच लोकसंख्येमुळे नैसर्गिक आपत्तीचे रुप आणखीच भयावह होऊ लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे होणारा वातावरणातील बदल आणि अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात धरणे उभारली जात असल्याने आसाममध्ये पुराचे गांभीर्य वाढले आहे.
– व्ही. के. कौर