ऐन निवडणुकीत महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची खिरापत
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने महायुतीतील बंडोबांना थंड करण्यासाठी महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह सदस्यांची खिरापत वाटली आहे. ऐन निवडणुकीत ब-याच नेत्यांना महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद दिले गेल्याने महायुतीतील बंडोबा थंड होतील, असा नेत्यांचा कयास आहे. तब्बल २७ महामंडळांवर नेत्यांना ही संधी दिली आहे. त्यानुसार परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड केली.
ऐन विधानसभा निवडणुकांच्या राजी-नाराजी नाट्यापूर्वीच अनेकांचे बंड थांबविण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रशांत परिचारक यांना संधी देण्यात आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून प्रशांत परिचारक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याची चर्चा रंगली आहे.
राज्य सरकारने अलिकडे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची घोषणा करीत विविध महामंडळांच्या निर्माणाची घोषणा केली होती. त्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केली होती. या महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची निवड करण्यात आली तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२ (२)(ब)मधील तरतुदीनुसार निवड केली.
२७ महामंडळांवर नियुक्त्या
-महाराष्ट्र रोजगार हमी परिषद : शहाजी पवार, अध्यक्ष
-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ : दिलीप कांबळे, अध्यक्ष
-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती : सचिन साठे, उपाध्यक्ष
-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग : सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष
-वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ : निलय नाईक, अध्यक्ष
-महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ : प्रशांत परिचारक, अध्यक्ष
-मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ : इद्रिस मुलतानी, अध्यक्ष
-महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : प्रमोद कोरडे, अध्यक्ष