सरकारचे काम हाच चेहरा, मविआने चेहरा जाहीर करावा
मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारने सव्वा दोन वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सादर केला. आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अडीच वर्षात झालेली मूठभर कामं व आमच्या सरकारने केलेले प्रचंड काम लोकांसमोर आहेत. त्याची पोहोचपावती जनता या निवडणुकीत देईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जातेय. महायुतीने त्यांचा चेहरा जाहीर करावा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने गेल्या सव्वा दोन वर्षातील राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेत सादर केला. त्या वेळी बोलताना शिंदे यांनी महाविकास आघाडी विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना गेमचेंजर बनली आहे. या योजनेमुळे विरोधकांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते सीएम-सीएम करीत आहेत तर आम्ही काम-काम करीत आहोत. राज्यातील जनतेला कॉमनमॅन न ठेवता त्याला आम्हाला सुपरमॅन करायचे आहे. आम्हाला कोणत्याही पदाचे डोहाळे लागलेले नाहीत. आम्ही टीम म्हणून काम करीत आहोत. आमच्या चेह-यापेक्षा त्यांनी आता विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
फडणवीसांचे
पवारांना आव्हान
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर स्वत: इथे बसले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आव्हान दिले.