22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या स्टार प्रचारकांना चांगले यश

महायुतीच्या स्टार प्रचारकांना चांगले यश

नागपूर : विदर्भातील ६२ जागांवर महायुतीने ६४ उमेदवार रिंगणात उतरविले होते. सिंदखेड राजा आणि मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत झाली. एकूणच ६२ मतदारसंघांचे रणांगण गाजविण्यासाठी महायुतीतील भाजपने दिग्गज स्टार प्रचारकांची फौज कामाला लावली. त्यांची ही मोहीम फत्ते झाली असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, नगर विकासमंत्री कैलास विजयवर्गीय, विदर्भाचे सुपुत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन धडाका लावला.

विशेषत: शासनाच्या योजना, लाडकी बहीण, विविध विकासकामांच्या माध्यमातून स्टार प्रचारकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले. तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील रामटेक आणि भंडारा येथे घेतलेल्या प्रचारसभा यशस्वी ठरल्या. तेथून त्यांचे उमेदवार निवडून आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विदर्भात ८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. विदर्भात त्यांना फक्त अमरावती येथे निवडणूक काळात येता आले. तीच एकमेव जागा त्यांच्या पारड्यात पडली. उर्वरित मोर्शी जागा मैत्रीपूर्ण लढतीत भाजपने बळकावली तर दुसरी मैत्रीपूर्ण लढतीत सिंदखेड राजा येथील जागा मिळाली. उर्वरित पुसद, तुमसर, अर्जुनी मोरगाव आणि अहेरी या जागा स्थानिक उमेदवारांनी आपल्या ताकदीवर निवडून आणल्या. काटोलमध्ये अनिल देशमुख नामक उमेदवार रिंगणात उभा करून मतदारांना भ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला.

कुठे-कुठे झाल्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकोला आणि चिमूर, गृहमंत्री अमित शहा हे मलकापूर, अमरावतीच्या वरुड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूर्तिजापूर, वाशिम, तिवसा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे कामाठी आणि नागपूर, नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचे सर्वच जिल्हे धुंडाळून काढले. त्या सर्वच जागांवर भाजप विजयी ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR