29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत राष्ट्रवादीला जागा पाच, पण अजित दादांचे प्रत्यक्ष दोनच उमेदवार

महायुतीत राष्ट्रवादीला जागा पाच, पण अजित दादांचे प्रत्यक्ष दोनच उमेदवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या जागावाटपावेळी मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चर्चा होती. आपल्याला सुरुवातीला अमित शहांकडून लढण्यास सांगितले पण तिकिट लवकर जाहीर न झाल्याने माघार घेत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. छगन भुजबळ यांच्या भूमिकेनंतर राज्यात अजित पवार यांच्या गटाला पाच जागाच मिळत असल्याचे स्पष्ट झाले. पण या पाच जागांमध्येही अजितदादांच्या गटाचे दोनच उमेदवार असणार आहेत. अजित पवार यांच्या गटाकडे बारामती, रायगड, उस्मानाबाद, शिरूर आणि परभणी या पाच जागा आहेत.

अजित पवार गटाच्या वाट्याला पाच जागा आल्या असल्या तरी त्यातील दोन जागांवर बाहेरील उमेदवार आहेत तर एक जागा मित्रपक्षाला सोडावी लागली. यामुळे महायुतीत पाच जागा मिळूनही अजित पवार यांचे प्रत्यक्ष दोनच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार विजयी झाले होते. यात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे , श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे हे चौघे होते. यापैकी सुनील तटकरे वगळता इतर तिघे शरद पवार यांच्यासोबत आहेत. अशा परिस्थितीत जागावाटपात अजित पवार गटाकडून विद्यमान खासदारांच्या जागा आणि अधिक दोन ते तीन जागांसाठी आग्रह होता. पण त्यांच्या वाट्याला पाच जागा आल्या.
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेलीय. तर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे मैदानात आहेत. पाचपैकी या दोन जागांवरच अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये उस्मानाबाद, परभणी आणि शिरूर मतदारसंघात बाहेरील आणि मित्रपक्षाचे उमेदवार आहेत.

उस्मानाबादमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली गेली. तर शिरूरमध्येही शिवसेनेच्या आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली गेली. याशिवाय परभणीचा मतदारसंघ अजित दादांच्या गटाने मित्रपक्षासाठी सोडला. तिथे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची साता-याची जागा मिळावी असा प्रयत्न अजित पवार यांचा होता. मात्र तिथे भाजपने उदयनराजेंना उमेदवारी दिली. त्या बदल्यात नाशिकची जागा मिळेल अशी चर्चा होती. पण नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने दावा केल्याने भुजबळांना माघार घ्यावी लागल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR