लातूर : प्रतिनिधी
महायुती सरकारचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाचे कोणतीही योजना आणि काम मिळत नाही, हे सरकार आता आपणाला उलथून टाकायचे आहे, असे सांगून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, काँग्रेस महाविकास आघाडीच्या काळात सामान्य माणसाला न्याय मिळाला, आज सामान्य माणसाची पिळवणूक होत आहे, ती थांबविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणायचे आहे. माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे औसा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील व संघटनेतील नेते पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. माजी मंंत्री आमदार देशमुख यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
औसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अर्जुन निलेवाडे, दत्ता देवकते, संजय घोडके, सचिन रुबदे, गोविंद जाधव, तानाजी घोडके, परमेश्वर जाधव, सुमित जाधव, रतन निले, उत्तम जाधव, पांडुरंग शिंदे, सतीश माने, शिवसेना शिंदे गट पदाधिकारी जितेंद्र शिंदे, गोपाळ शिंदे, राजेंद्र सगर, त्रषिकेश गोगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील किरण कांबळे, प्रताप कांबळे, रासपचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, वंचित बहुजन आघाडीचे विनोद टेंकाळे आदीसह विविध पक्षातील व संघटनेतील नेते पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, औसा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अजहर हाशमी, औसा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मुकेश बिदादा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष विद्याताई पाटील, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, अजित माने, आबासाहेब पाटील उजेडकर, सईताई गोरे, एकनाथ पाटील, सुभाष घोडके, विजयकुमार पाटील, प्रवीण सूर्यवंशी, प्रा. प्रवीण कांबळे बालाजी साळुंखे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, औसा काँग्रेसचे बळकटीकरण होत आहे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांचे काम कौतुकास्पद आहे. महायुतीच्या कारभाराला कंटाळून विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिका-यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, महायुती सरकारचे दिवस आता भरले आहेत. हे सरकार प्रत्येकस्तरावर अपयशी ठरत आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी व युवक विरोधी धोरणे राबवते शेतकरी कर्जबाजारी होत आहेत त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. लोकसभेला जनतेने महायुती सरकारला धडा शिकवला त्याप्रमाणे विधानसभेलाही त्यांना धडा शिकवतील, असे त्यांनी सांगितले.
महायुती सरकारचा कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाचे काम होत नाही, हे सरकार आता आपणाला उलथून टाकायचे आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या काळात सामान्य माणसाला न्याय मिळाला, आज सामान्य माणसाची पिळवणूक होत आहे आपणाला महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणायचे आहे. स्वातंत्र्याच्या काळापासून औसा मतदारसंघात काँग्रेसने सर्वाधिक निवडणुका जिंकल्या आहेत. सत्ताधा-यांंच्या पाच वर्षातील कामाची पोलखोल कार्यकर्त्यांनी करावी. महायुती सरकारच्या कारभारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, महिलांवर अत्याचार होत आहेत, बेकारी वाढत आहे, शेतीमालाला भाव मिळत नाहीत, काँग्रेस पक्षाने लातूर जिल्ह्यात उद्योग उभारले महायुती सरकारच्या काळात येथे एकही नवा उद्योग आला नाही, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी यांनी केले तर मनोगत लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशेल उटगे यांनी व्यक्त्त केले. सूत्रसंचालन ओमप्रकाश झुरळे यांनी केले तर प्रशांत भोसले यांनी आभार मानले.