मुंबई : फडणवीस सरकारमधील सर्व सहाही राज्यमंत्री हे केवळ नामधारीच असल्याचे समोर आले आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी फारच तुटपुंजे अधिकार दिल्याने हे पद शोभेचे आणि नामधारी असल्याची भावना राज्यमंत्री व्यक्त करत आहेत. ही नाराजी घेऊन सर्व राज्यमंत्री फडणवीस यांना भेटून अधिकार देण्याची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फडणवीस सरकारमध्ये आशिष जयस्वाल, योगेश कदम, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ हे सहा राज्यमंत्री आहेत. या सहा मंत्र्यांकडे १२ खाती वगळता अन्य खात्यांची जबाबदारी आहे. मात्र या राज्यमंत्र्यांना केवळ ३ आणि ४ वर्गातील कर्मचा-यांबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजे शिपाई, कारकून आणि अव्वल कारकून यांच्या बदल्या, पदोन्नती यांचे अधिकार आहेत. याशिवाय वर्ग दोनच्या अधिका-यांच्या विभागीय चौकशीचा अधिकार मिळाला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडताच राज्यमंत्र्यांचा सन्मान राखला जाईल असे अधिकार प्रदान करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले होते. तुम्ही असे अधिकार दिले नाहीत तर मी स्वत:च राज्यमंत्र्यांना अधिकार देईन, अशी तंबीही दिली होती. यानुसार फडणवीस यांनी स्वत: योगेश कदम यांना काही अधिकार दिले. तर काही कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कुठले अधिकार दिले याचे परिपत्रक काढले. पण कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेले अधिकारही अगदी किरकोळ होते.
सहापैकी ३ भाजपचे, २ शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादीचे राज्यमंत्री आहेत. पण या पक्षांच्या कॅबिनेट मंत्र्यांनीही त्यांना अधिकार देताना हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. त्यांच्याच पक्षाचे मंत्री मनाचा मोठेपणा दाखवायला तयार नाहीत. हीच नाराजी आता शिगेला पोहोचली असून राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकार द्यावे यासाठी साकडे घालणार असल्याची माहिती आहे.