17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्राचा कौल : राजकारणावर परिणाम घडविणारे ५ मुद्दे

महाराष्ट्राचा कौल : राजकारणावर परिणाम घडविणारे ५ मुद्दे

लातूर :  निवडणूक डेस्क
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, इतर राज्यांच्या निवडणुकांमध्येही दिसू शकतात. या निकालांचा परिणाम भविष्यात राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो. प्रत्यक्षात २८८ जागांपैकी महायुतीने २२९ जागा जिंकल्या आहेत, भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवून १३२ जागा जिंकल्या आहेत. भाजपचा हा ८९% स्ट्राइक रेट विरोधकांनाही गोंधळात टाकणार आहे. या निकालाचे भविष्यात काय परिणाम होतील, हे पाहू या …
१. सुधारणांची रुपरेषा निश्चित होणार
मुळात मोदी सरकारने सुधारणांच्या दिशेने कोणताही हलगर्जीपणा दाखवला नाही. उलटपक्षी आयुष्मान भारत वैद्यकीय विमा संरक्षण वाढवणे आणि संयुक्त पेन्शन योजना सुरू करणे, यांसारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या. सरकारने एक धाडसी वक्फ बोर्ड विधेयकही आणले. मोदी सरकार आता वक्फ विधेयकावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जाईल, ज्याचे उद्दिष्ट वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे आहे. हे समान नागरी संहिता पुढे नेण्यास मदत करू शकते, ज्याला पंतप्रधान मोदींनी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणून पुढे आणले आहे.
२. हिंदू एकतेचे नवे सूत्र
लोकसभा निवडणुकीत भाजपला चुरशीचा सामना करावा लागला. एकीकडे विरोधी पक्षांना मुस्लिम मते मिळाली, तर दुसरीकडे जात जनगणना आणि संविधान धोक्यात आहे, या काँग्रेसच्या प्रचारामुळे भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सर्व जाती आणि समुदायांची मते मिळविण्यात यश आले, पण २०२४ मध्ये भाजपला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है, तो सेफ है’, यांसारख्या घोषणांमुळे सर्व हिंदूंना एकवटले. याशिवाय आरएसएसने ‘सजग रहो’ (जागृत राहा) मोहिमेसाठी ६५ संघटनांचा समावेश केला.
३. काँग्रेसशी थेट स्पर्धेत भाजप पुढे
महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक नुकसान भाजपमुळे झाले. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती, तिथे काँग्रेसचा पराभव झाला. ७५ पैकी ६५ जागांवर भाजपने विजय मिळवला. यातील ३६ जागा एकट्या विदर्भातील आहेत. भाजपचा उदय आणि काँग्रेसचे पतन, हे पक्षांच्या थेट लढतीतील कामगिरीवरून स्पष्ट होते. यावरुन पक्षाची संघटनात्मक ताकद आणि लोकप्रियता दिसून येते. भाजपशी थेट मुकाबला करताना, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राइक रेट ८% वरून २०१४ मध्ये ३०% पर्यंत वाढला होता, तर भाजपचा स्ट्राइक रेट ९२% वरून ७०% पर्यंत घसरला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये झालेल्या हरियाणा निवडणुकीने भाजपचे मनोबल वाढवले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हा विश्वास दृढ केला आहे की, थेट लढतीत भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे आहे.
४. मित्रपक्षांशी चर्चेत काँग्रेसचा शक्तिपात
हरियाणात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून काँग्रेसवर अनेक हल्ले करण्यात आले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत पक्षाच्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा मित्रपक्ष त्यावर हल्ला करू शकतात. महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्ट्राइक रेट सुमारे १९% होता, जो अत्यंत वाईट आहे. हरियाणात काँग्रेसने आम आदमी पार्टीला इंडिया आघाडीत घेतले नाही. यासंदर्भात नंतर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. शिवसेना उद्धव गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये हरियाणातील काँग्रेसच्या पराभवासाठी पक्षाचा ‘अतिआत्मविश्वास आणि राज्य नेतृत्वाचा अहंकार’ याला जबाबदार धरले गेले. महाराष्ट्रातही काँग्रेसने मोठा भाऊ बनण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सादर करू दिले नाही.
५. लोकाभिमुख योजना, पायाभूत सुविधांचे मिश्रण
महाराष्ट्रातील मोठे पायाभूत प्रकल्पही धोक्यात आले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘मविआ’ने रोख मदतीचे आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत, महायुतीने लाडकी बहिण योजनेसारख्या रोख हमी योजनेचे आश्वासन दिले. पायाभूत सुविधांच्या विकासाची योग्य सांगड कायम ठेवत महायुतीने या निवडणुकीत विरोधकांचा मोठ्या प्रमाणात पराभव केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महायुतीने मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, महालक्ष्मी रेसकोर्सवरील उद्याने सुरू करणे, गारगाई पिंजाळ जलप्रकल्प पुढे नेण्याच्या घोषणा केल्या. ‘मविआ’ आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशीही लोकांमध्ये भावना निर्माण झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR