मुंबई : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ थंडावली आहे. आता सर्व राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मतदारांचा कौल कोणाच्या पदरात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. उद्या (दि.२०) मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या झालेल्या हल्ल्यामुळे देखील त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. या संदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणा-या लोकांनी त्यांना दगडफेक करत अक्षरश: रक्तबंबाळ केले. हा हल्ला करताना हल्लेखोरांनी भाजप पक्षाच्या बाजूने ‘जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या.
राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर ठार मारण्याच्या दृष्टीने हल्ला होतो. बाबा सिद्दीकींची हत्या होते. या राज्यामध्ये कायदा -सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत. याला जबाबदार शिंदे सरकार आहे. आता निवडणूक आयोगाकडे राज्याची सर्व सूत्रे आहेत तरीही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. कारण निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असून त्यांच्या माणसांना धरून काम करत आहे,’असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, उद्या मतदान आहे त्यापूर्वी विरोधी पक्षाच्या किती नेत्यांना धमक्या येतील हे सांगता येत नाही. किती कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर हल्ले होतील हे सांगता येत नाही. खोटे गुन्हे दाखल केले जातील. नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्ही स्टंटबाजी करायला शिकलो नाही. याची आम्हाला गरज देखील नाही. नेत्यांवर हल्ला करण्याची ही भाजपची जी महाराष्ट्रामध्ये नौटंकी सुरू आहे ही यापूर्वी कधीही नव्हती. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी असे वातावरण नव्हते. ते देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्या काळामध्ये झालं आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत तर महाराष्ट्रात नेत्यांवर हल्ले होत आहेत. काय यांच्या हातामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहणार आहे’’ असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
‘व्होट जिहाद’ थांबलेला विषय
पुढे संजय राऊत म्हणाले की, मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपला राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. भाजपची आजची जाहिरात पाहा त्यावरूनच हे लक्षात येईल. ‘व्होट जिहाद’ वैगरे हे सगळं आता थांबेल. हे आता अशा पातळीवर आले आहेत की त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. पण आम्ही असे दंगे होऊ देणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.