अमरावती : प्रतिनिधी
सरकारने लाडकी बहीण योजना घोषित करत महिलांना १५०० रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी, सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा ६ ते १२ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे घोषित केले. मात्र, यावर काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे.
राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली असून निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मानजनक रक्कम द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणादरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्य प्रशिक्षणादरम्यान दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयांत सरकार फसवणूक करत आहे. यामध्ये लाडक्या भावा-बहिणींमध्येच भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला.
शिक्षक संघटनांचा विरोध
कंत्राटी शिक्षकांना वेतन मिळत नाही. मात्र, सरकार योजनांच्या नावाखाली बेरोजगारांवर पैशाची उधळपट्टी करत आहे, असे सांगत काही शिक्षक संघटनांनी सरकारच्या ‘लाडक्या’ योजनांना विरोध केला आहे.