27.6 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeमहाराष्ट्रमहिला डॉक्टरांचे अश्लील व्हीडीओ बनवले

महिला डॉक्टरांचे अश्लील व्हीडीओ बनवले

कराड : प्रतिनिधी
कराडमधून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. शहरातील दोन नामांकित महिला डॉक्टरांचे एआयच्या माध्यमातून अश्लील व्हीडीओ बनवले गेल्याचे समोर आले आहे. हे व्हीडीओ बनावट असून, परराज्यातून तयार करण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कराड शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यामागचा सूत्रधार स्वत:ला ‘डॉक्टर’ असल्याचे सांगतो, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी दोन महिला डॉक्टरांनी कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सोशल मीडियावर त्यांचे अश्लील व्हीडीओ शेअर करण्यात आले होते. तपासाअंती हे व्हीडीओ एआय तंत्रज्ञानाने बनवले गेले असून, त्यात संबंधित डॉक्टर महिलांना दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह कृती करताना दाखवले गेले होते.

तपासादरम्यान पंजाबमधील विकास शर्मा या इसमाचा तपासात सहभाग निष्पन्न झाला असून, त्याने कबूल केले की कराडमधीलच एक डॉक्टर राजेश शिंदे यानेच हे व्हीडीओ तयार करण्याची योजना आखली होती. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे.

विकास शर्माने तपास अधिका-यांना सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे त्याने हे काम केले. आरोपी राजेश शिंदे याने त्याला काही मोबाईल क्रमांक पाठवले व त्या नंबरचे गट तयार करून अश्लील व्हीडीओ पाठवण्यास सांगितले. यानंतर एआयच्या सहाय्याने खोटे व्हीडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

या बनावट व्हीडीओंमुळे संबंधित महिला डॉक्टरांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसू शकला असता, मात्र त्यांनी वेळेवर पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे व्हीडीओ व्हायरल होण्याआधीच नियंत्रण मिळवता आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR