नागपूर : प्रतिनिधी
८ मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘पिंक मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘पिंक मॅरेथॉन’ला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी समाजसेविका अमृता फडणवीस यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवत सुरुवात करण्यात आली. यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या हजारो महिलांनी धावत स्त्री-शक्तीचा जयघोष केला.
या मॅरेथॉनच्या सुरुवातीला अमृता फडणवीस यांनी मंचावर उपस्थित राहून महिलांचे मनोबल वाढवले. महिलांच्या आग्रहाखातर त्यांनी मंचावर काही गाणी सादर केली. तसेच उपस्थित महिलांसोबत झुंबा डान्सवर ठेका धरला. त्यांच्या या सहभागामुळे कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली होती.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस मनमोकळेपणाने संवाद साधला. आज सकाळी स्त्री-शक्तीचा जो जागर नागपुरात पाहायला मिळाला, तो खरोखरच आनंददायी आहे. स्त्री सुदृढ राहिली तरच समाज सुदृढ राहतो. महिलांच्या सक्षमीकरणाची सुरुवात त्यांच्या आरोग्यापासून आणि शारीरिक हालचालींपासून व्हायला हवी. करिअरसोबतच स्त्रियांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि आर्थिक साक्षर होणे ही काळाची गरज आहे, असा सल्ला अमृता फडणवीस यांनी दिला.
प्रगतीसाठी शांतता आणि सुरक्षा अत्यंत आवश्यक
यावेळी त्यांनी जगातील सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीवर भाष्य केले. जगभरात सत्ता आणि वर्चस्वासाठी युद्ध सुरू आहे, परंतु भारत हा एक शांतीप्रिय देश आहे. प्रगतीसाठी शांतता आणि सुरक्षा अत्यंत आवश्यक असते. या संदर्भात आपले मुत्सद्दी जी भूमिका घेतील ती महत्त्वाची ठरेल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल त्यांनी नागपूरच्या महापौर आणि प्रशासनाचे आभार मानले.

