ठाणे : प्रतिनिधी
दिवाळी म्हटली की फराळ आलाच. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरी फराळ तयार करणे सर्वांना शक्य होत नाही. परिणामी, तयार (रेडिमेड) फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. यंदा मात्र दुकानांमधील फराळाच्या पदार्थांवर १२ टक्के जीएसटी आकारला जात असल्यामुळे प्रतिकिलो सुमारे ४० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. याउलट बचत गटांमार्फत बनवलेल्या घरगुती फराळावर जीएसटी लागू न झाल्यामुळे हे पदार्थ स्वस्तात उपलब्ध होत असून नागरिकांचा कल याच घरगुती फराळ घेण्याकडे वाढला आहे.
ठाण्यातील ‘जय जय रघुवीर समर्थ’ आणि ‘सावित्री’ या दोन महिला बचत गटांनी यंदा दिवाळीनिमित्त पारंपरिक फराळ तयार केला असून, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात बचत गटाकडून ५०० किलोहून अधिक फराळ तयार केला असून त्यासाठी जवळपास ५० हून अधिक महिला मेहनत घेत आहेत. गेल्यावर्षी या महिलांनी जवळपास ४०० किलो फराळाची विक्री केली होती. मात्र यंदा मागणी वाढल्याची माहिती महिला बचत गटाने दिली.
महिला बचत गटातील महिलांनी भाजणी चकली, पोहे चिवडा, शंकरपाळी, लाडू, करंजी आदी पारंपरिक पदार्थ २०० ते ५०० प्रति किलो दराने विक्रीस ठेवले आहेत. कमी दर, घरगुती चव आणि दर्जेदार तयारी यामुळे हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदार वर्ग तसेच सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मायभूमीपासून दूर असलेल्या परदेशातील नागरिकांना या घरगुती फराळातून गावाकडच्या चवीचा आणि दिवाळीच्या आठवणींचा आनंद घेता येत असल्यामुळे या उपक्रमाला विशेष लोकप्रियता मिळत आहे.
या महिला बचत गटात नामदेव वाडी, सिद्धेश्वर तलाव, पाटील वाडी, रमाबाई नगर या भागातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या महिलांनी राज्य सरकारकडून मिळणा-या लाडक्या बहीण योजनेचे दीड हजार रुपये बचत गटात गुंतवले आहेत. त्याच पैशातून त्यांनी हा व्यवसाय निर्माण केला असून इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. रोजगारासाठी मुंबईकडे पाहण्याऐवजी, स्वत: काही तरी निर्माण करा आणि इतर महिलांनाही रोजगार द्या अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संदेशातून प्रेरणा मिळाली असे महिलांनी सांगितले.