24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमांजरा परिवार विश्वासार्हतेचा लोकप्रिय ब्रँड

मांजरा परिवार विश्वासार्हतेचा लोकप्रिय ब्रँड

लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने बँका आणि इतर संस्थानी प्रयोगशील राहून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा उद्देश साध्य केला आहे, त्यामुळे मांजरा हा विश्वासहारतेचा ब्रँड तयार झाला आहे, ही विश्वासार्हता कधीही कमी होऊ दिली जाणार नाही, असा विश्वास, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त्त केला.

विकास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वैशालीनगर निवळी येथील कारखाना साइटवर कारखान्याची २२ वी सर्वसाधारण सभा दि. १ सप्टेंबर रोजी अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत मांजरा परिवाराचे आधारवड दिलीपराव देशमुख यांचा डेक्कन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आमदार धीरज देशमुख आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांचा या सभेत यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ शिवाजी काळगे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, रीड लातूरच्या संस्थापीका सौ. दिपशिखा धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, युनिट-२ चे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हॉइस चेअरमन समद पटेल, श्रीपतराव काकडे, सचिन पाटील, संभाजी सुळ, अभय साळुंके, अजित माने, कल्याण पाटील, मारुती पांडे, लक्ष्मण मोरे, ज्योतीताई पवार, जितेंद्र स्वामी, सचिन दाताळ, राजकुमार पाटील, प्रताप पाटील, कैलास पाटील, विदया पाटील, स्वयंप्रभा पाटील उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, डेक्कन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट या संस्थेकडून माझा झालेला सन्मान हा प्रातिनिधीक स्वरुपाचा होता, या सन्मानासाठी मांजरा परिवारातील प्रत्येक घटक तेवढाच हक्कदार आहे त्यामुळे मी सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आहे, मांजरा परिवाराची सुरुवात, ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने मांजरात कारखान्याची स्थापना करून झाली आहे, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुखह्याांचे ग्रामीण विकासाच्या स्वप्न साकार करण्यासाठी आज मांजरा परिवारातील प्रत्येक संस्था आणि त्या संस्थेची निगडित असलेला प्रत्येक माणूस प्रयत्नशील आहे, या कार्यातील सर्वांचे योगदानच एकूण यशा मागचे गमक आहे, असे मी मानतो आहे. आधी केले मग सांगितले या युक्तीप्रमाणे मांजरा परिवारात चांगले निर्णय घेतले जातात, त्यावर अंमलबजावणी केले जाते आणि मग इतर समोर त्याचे परिणाम ठेवले जातात, यातून मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात मांजरा परिवाराचा आदर्श अनुकरणीय पॅटर्न तयार झाला आहे. आता हा परिवार जिल्हा पुरता मर्यादित राहिला नसून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कारखाना आदर्श पद्धतीने चालवून इतरांना त्या त्या पद्धतीचे कार्य करण्याची प्रेरणा देत असल्याचेही त्यांनी म्हंटले.

तसेच यावेळी सभापती जगदीश बावणे यांनी मनोगत व्यक्त्त केले. यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, रणजीत पाटील, गोविंद डूरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, तोडणी ठेकेदार मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे संचालक, खातेप्रमुख, अधिकारी, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पन केले, दीपप्रज्वलन केले, विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी केले तर अहवाल वाचन व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी केले, संचालक रणजित पाटील यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल इंगळे पाटील यांनी तर अमर मोरे यांनी आभार मानले.

मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या कामगिरीने महायुतीची झोप उडाली
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या उत्तुंग यशामुळे विद्यमान महायुती सरकारची झोप उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही आपली एकजूट कायम राहिल्यास मराठवाड्यात आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त्त केला. पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, केंद्र शासनापेक्षा महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जनतेचा अधिक रोष आहे, त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. काँग्रेस आणि मित्र पक्षाकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या प्रचंड वाढली आहे, यावरुन राज्यात परिवर्तन अटळ आहे हे दिसून येत आहे. जागा मर्यादित आणि इच्छुक अधिक असले तरी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना विजय करण्यासाठी सर्वांनी आपला एकोपा कायम ठेवायचा आहे.

सुरक्षित बहीण योजना कधी आणणार
यावेळी पूढे बोलतांना यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महायुतीची झोप उडाली असून लाडक्या बहिणी सारख्या योजना जाहीर केल्या जात आहेत, लाडक्या बहिन योजनेला आमचा विरोध नाही परंतु सुरक्षित बहिण योजना कधी आणणार हा आमचा सरकारला प्रश्न आहे.

कंत्राट वाटण्यात आणि कमिशन गोळा करण्यात सरकारचे प्रतिनिधी व्यस्त
राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या तिघाडी सरकारमध्ये एक वाक्यता नाही, कंत्राट वाटण्यात आणि कमिशन गोळा करण्यात या सरकारचे प्रतिनिधी धुंद आहेत हे सर्व चित्र महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे असे यावेळी आमदार अमित देशमुख म्हणाले.

महायुती सरकारला माफी नाही
वा-याने पुतळा पडू शकतो, असे आजवर जगभरातले एकही उदाहरण नाही त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे, या परिस्थितीत सरकारला जनता कदापिही माफ करणार नाही हे उघड आहे, असे यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले.,

बदलत्या तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीला मोठे भवितव्य
तंत्रज्ञानात होत असलेल्या संशोधनामुळे उसापासून उपपदार्थ निर्मिती आणि त्याच्या वापरात क्रांतिकारी बदल घडून येत आहेत, या परिस्थितीत ऊस शेतीला मोठे भवितव्य असून हे ऊसउत्पादन वाढवण्यासाठी मराठवाड्यात मोठा वाव असल्याचेही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पराभव समोर दिसत असल्याने निवडणूका पूढे ढकलण्याचे षडयंत्र
महिलांची सुरक्षा, भ्रष्टाचार, सरकारी पैशाची उधळपट्टी, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे महायुती सरकारची नाचक्की झाली आहे. परिणामी पराभव समोर दिसत असल्याने विधानसभा निवडणूका पूढे ढकलण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असे असले तरी यांनी कधीही निवडणूका घेऊ द्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. कोरोना सारख्या नैर्सगीक आपत्तीत महाविकास आघाडी सरकारने राज्यातील प्रत्येक नागरीकांची स्वता:च्या कुटूंबातील सदस्या सारखी काळजी घेतली त्या तुलनेत विद्यमान महायुतीचे सरकार जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. त्यामुळे नागरीक दोन सरकाच्या कामगीरीची तुलना करतांना दिसत आहेत. महायुतीच्या सर्व्हेमध्ये हे सर्व दिसत असून आता निवडणूका झाल्या तर आपला पराभव निश्चीत आहे याची जाणीव महायुतीच्या नेत्याना झाली आहे. त्यमुळे निवडणूका पूढे ढकलण्याचा त्याच प्रयत्न आहे, असेही आमदार धिरज देशमुख यांनी म्हटले. ज्या कारखान्याकडून माझा सत्कार झाला तो कारखाना आदरणीय विलासराव देयामुख यांच्या नावे चालतो आहे. आई या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत. आमदार अमित भैया संस्थापक आहेत. त्यामुळे हा स्त्कार आशीर्वाद म्हणून स्विकारतो आहे. स्विकारलेला हा सन्मान मी काकांच्या (दिलीपरावजी देशमुख) चरणी समर्पीत करीत आहे, असेही आमदार धिरज देशमुख यांनी म्हटले.

कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी : खा. डॉ. शिवाजी काळगे
केंद्रापेक्षा राज्यातील सरकारवर जनतेचा अधिक रोष आहे त्यामुळे लोकसभा निवडणूकी प्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून संधीचे सोने करावे, राज्यात परीवर्तन घडवावे असे आवाहन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी या प्रसंगी केले. लातूर मतदारंसघातील जनतेने आशीर्वाद देऊन लोकसभत पाठविल्याबद्दल आणि मांजरा परिवाराने सत्कार केल्याबद्दल त्यांनी यावेळी आभार मानले.

राज्यात परिवर्तन घडवावे : खासदार ओमराजे निंबाळकर
शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेचे जगणेच केंद्र आणि राज्य सरकारला मान्य नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून या घटकांची सातत्याने पिळवणूक केली जात आहे, असे सांगून या सर्व घटकांनी एकत्र येऊन आगामी विधानसभा निवडणूकीत अन्यायकारक सत्ता उलथवून टाकावी, असे आवाहन, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR