31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरमाघी यात्रेसाठी पंढरीत ४ लाखांवर भाविक

माघी यात्रेसाठी पंढरीत ४ लाखांवर भाविक

सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज, विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, नदीपात्र आटल्याने नाराजी

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरीतील सावळ्या विठुरायाच्या माघी यात्रा सोहळ्यासाठी ४ लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीनगरीत हजेरी लावली. मंगळवारी माघ महिन्यातील जया एकादशी असल्याने भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली.

माघ यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य व अधिका-यांकडून करण्यात येणार आहे. माघ वारी सोहळ्यासाठी भाविकांनी गेल्या २ दिवसांपासून गर्दी करणे सुरू केले असून टाळ, मृदंग, भगव्या पताकांमुळे पंढरीनगरी गजबजून गेली आहे. येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर आणि परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्यात आले असून दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, यासाठी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. पंढरपूर नगरपालिकेकडून ज्यादा कर्मचारी नेमण्यात आले असून येणा-या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य यंत्रणा, आणि स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने चंद्रभागेचे पात्र कोरडे पडले असून पहिल्यांदाच यात्रा काळात ही वेळ आली आहे. पाणी नसल्यामुळे चंद्रभागेत स्नान करण्याचे भाग्य भाविकांना लाभले नसल्याने भाविक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. पंढरीनगरीत विठुरायाच्या प्रमुख ४ यात्रा दरवर्षी भरतात. यापैकी एक असणारी माघी यात्रा. या यात्रेत पंढरी नगरीत जनावरांचाही बाजार भरतो. वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार भरला असून या बाजारात हजारो खिलार जनावरे विक्रीसाठी आणण्यात आली आहेत.

या यात्रेसाठी पंढरीनगरीत ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले असून विठुरायाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी जया एकादशी असल्याने या दिवशी शाबुदाणा खिचडीचे वाटप भाविकांना दर्शन रांगेत होणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.

पाणी नसल्याने कुचंबना
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली असून पाणी नसल्याने भाविकांची कुचंबना होत आहे. शहरातील स्टेशन रोड, चौफाळा, नाथ चौक, प्रदक्षिणा मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली असून हरिनामाच्या गजराने पंढरीनगरी दुमदुमून गेली आहे.

दर्शनरांग गोपाळपुरापर्यंत
दर्शन रांग थेट गोपाळपुरापर्यंत पोहोचली असून, विठुरायाच्या दर्शनासाठी १० ते १५ तासांचा अवधी लागत असून दर्शन रांगेत भाविकांच्या चहापाणी, नाष्टा तसेच भोजनाचीही व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. पंढरीतील पहिल्याच यात्रेत भाविकांना भोजनाची व्यवस्था दर्शन रांगेनजिक करण्यात आली आहे.

जनावरांचा बाजार फुलला
माघी यात्रेनिमित्त दरवर्षी पंढरीत भरणारा जनावरांचा बाजार या वर्षीही फुलला असून हजारो जनावरे पंढरीनगरीत दाखल झाली आहेत. येथील वाखरी पालखी तळावर हा बाजार भरला आहे. यामध्ये खिलार जनावरे, पंढरपुरी म्हैस, जर्सी जनावरांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR