23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रमाघ यात्रेनिमित्त पंढरीत मंदिर प्रशासन सज्ज

माघ यात्रेनिमित्त पंढरीत मंदिर प्रशासन सज्ज

पंढरपूर /प्रतिनिधी
माघ एकादशी मुख्य सोहळा दि. ८ फेब्रुवारी रोजी असून यात्रा कालावधी दि. २ ते १२ फेब्रुवारी असा आहे. या यात्रेला सुमारे ४ ते ५ लाख भाविक पंढरपुरात येतात. दर्शनासाठी येणा-या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

माघी यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी दर्शन रांगेत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा, खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी पूजांची संख्या कमी करून सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे. दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी अनुभवी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून त्या बाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ह. भ. प. वासकर महाराज यांच्या दिंडीची नवमीला श्री विठ्ठल सभामंडप येथे आरती व अभंग, ह. भ. प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा द्वादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह. भ. प. औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा असून एकादशीला पहाटे श्रींची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्यांच्या हस्ते सपत्निक होत आहे. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका यांच्याकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकीय कक्षाची व्यवस्था
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालयामार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह २ अद्ययावत रूग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.

स्वच्छतेची काळजी
स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगर प्रदक्षिणा, दर्शन रांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता आऊटसोर्सिंग पध्दतीने करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत आहे.

अन्नछत्राचीही सोय
श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दु. १२ ते २ व रा. ७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून दर्शन रांगेत नवमीपासून चहा-शाबुदाणा, तांदळाची खिचडी तसेच पत्राशेड येथे दशमी, एकादशी व द्वादशीला अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR