पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहराचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये तब्बल ३०० कोटींची संपत्ती उघड झाली असल्याचा दावा केला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्तीबाबत गुप्त चौकशी पूर्ण केली असून आता उघड चौकशीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. अशाप्रकारे उच्चपदस्थ आयपीएस अधिका-याची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमिताभ गुप्ता यांनी तब्बल ३०० कोटीहून अधिकची संपत्ती विविध राज्यांमध्ये जमवली आहे. पुण्यातील प्रसिद्ध अॅमनोरा टाउनशिपमधील स्वीट वॉटर व्हिला प्रकल्पात त्यांनी जमिनीचा प्लॉट घेऊन त्यावर आलिशान व्हिला उभारला आहे. या व्हिलाची किंमत अंदाजे २५ ते ३० कोटी असल्याची शक्यता आहे. याशिवाय अमिताभ गुप्ता यांचे मुंबईतील सांताक्रुझ येथे २२ कोटींचा आलिशान फ्लॅट आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमिताभ गुप्ता यांनी जमीन आणि संपत्तीही खरेदी केली.
पुणे पोलीस आयुक्तपदावर असताना अमिताभ गुप्ता यांनी ८०० ते १००० शस्त्र परवाने वाटले असून प्रत्येक परवान्यासाठी १५ ते २० लाख रुपये घेतले असल्याचा धक्कादायक दावा देखील करण्यात आला आहे. या सगळ्यांची विस्तृत, उघड चौकशीची मागणी करण्यात आली मात्र सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप परवानगी मिळालेली नाही.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीची मागणी केली होती. लाचलुचपत विभागाने केलेल्या चौकशीत काही तथ्ये समोर आल्यानंतर आता विभागाने त्यांच्या उघड चौकशीची मागणी केली आहे.