24 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रमाझी लाडकी बहीण योजनेचे निकष शिथिल

माझी लाडकी बहीण योजनेचे निकष शिथिल

वयोमर्यादा ६५ वर, जमिनीची अट रद्द, मुदतही वाढविली
– मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची ६० वर्षांची वयोमर्यादा ६५ वर्ष करण्यात येत आहे. तसेच यासाठीच्या पात्रता अटीतून ५ एकर जमिनीची अट रद्द करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. महायुतीच्या भावंडांकडून महाराष्ट्रातील माता-भगिनींना हा माहेरचा आहेर आहे, तो नियमित देत राहणार आहोत. ऑगस्टपर्यंत नोंदणी झाली तरी ऑगस्टमध्ये जुलै-ऑगस्टचे पैसे मिळतील. त्यासाठी कोणी जर भगिनींकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला तात्काळ निलंबित करून जेलमध्ये टाकू, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेऊन याचा आदेशही लगेच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. यासाठीची वयोमर्यादा ६० वरून आता ६५ वर्षे करण्यात येत आहे. त्वरीत अंमलबजावणीसाठी सध्याचा बीपीएलचा जो डेटाबेस आहे, त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही. काही कारणांमुळे एखाद्या भगिनीची नोंदणी ऑगस्टला झाली तरी तिला जुलै महिन्याचे पैसेही मिळतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ९२ लाख ४३ हजार शेतक-यांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचा लाभ दिला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत २९ हजार ६४० कोटी रुपये सोळा हप्त्यात थेट बँक खात्यात जमा करणे सुरु आहे. राज्यातील ८५.६६ लाख शेतक-यांना लाभ दिला आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांची उत्पादकता वाढवणार आहोत.

मुल्यवर्धित साखळींसाठी ३४१ कोटी रुपयांची विशेष कृती योजना आखली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत १४ लाख ३३ हजार शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून ५ हजार १९० कोटी रुपये दिले. पीक कर्ज मंजूर करताना सिबिलचा वापर करून कर्जापासून वंचित ठेवण्यात येऊ नये, अशा बँकांना अतिशय काटेकोर सूचना दिल्या आहेत. प्रसंगी संबंधित बँकावर एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीत ३० टक्के कृषी पंप सौर उर्जेने जोडणार. मागेल त्याला सौर कृषी पंप आणि दिवसाकाठी वीज देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR