मुंबई : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका भाषणादरम्यान सोशल मीडियावर सरकार आणि स्वत:च्या विरोधात टीका करणा-या तरुणांविषयी आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला. मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले होते. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. आता बबनराव लोणीकर यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
बबनराव लोणीकर म्हणाले की, गाव पातळीवरचे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे मोदीजींना आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करतात. त्यांच्याविषयी मी बोललो. हे राजकीय पक्षाचे १० जणांचे टोळके विरोध करते. आमची खेड्यातली भाषा आहे. आम्ही वडिलांना बाप म्हणतो, आईला माय म्हणतो. एखाद्या मुलाने काम केलं नाही, तू नीट शिकत नाही तर आम्ही त्याला कार्टं म्हणतो. ही आमची बोलीभाषा आहे. आमच्या ग्रामीण भाषेत मी बोललो आहे. मी कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या आणि शेतक-यांच्या विरोधात ४० वर्षांत बोललो नाही. मी शेतक-यांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, असे त्यांनी म्हटले.
बबनराव लोणीकर पुढे म्हणाले की, राजकीय लोकांना माझ्या वक्तव्याच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. माझ्या विरोधात पळता भुई थोडी करू, असे विरोधक बोलत आहेत. तुम्ही कितीही धमक्या दिल्या तरी माझं काम सुरूच राहणार आहे. ते थांबणार नाही. मी शेतक-यांच्या विरोधात गेल्या ४० वर्षांत कधीही बोललो नाही. जनता जनार्दन माझी मायबाप आहे. शेतक-यांच्या आशीर्वादाने मी २५ वर्षे निवडून येत आहे. त्याच्यामुळे मी जनतेच्या आणि शेतक-यांच्या विरोधात बोललो नाही. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतक-यांच्या विरोधात बोलणार नाही. मला शेतक-यांची माफी मागायला काय, मी हजार वेळा शेतक-यांची माफी मागील. पण, मी बोललेलो नाही. मला शेतक-यांबद्दल आदर आहे. काही लोकांना सहन होत नाही की, हा नेमका निवडून कसा येतो? म्हणून नऊ-दहा लोकांचे टोळके जे राजकीय पक्षांनी पोसलेलं आहे, त्यांचा अतिरेक होत आहे. मी गाव पातळीवरील कार्यकर्त्याविषयी बोललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.