मुंबई : प्रतिनिधी
‘मातोश्री’वर वक्फ बोर्डाचा प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली. हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक होते. ते लोक सोडून इतर सगळा मुस्लिम समाज आमच्याबरोबर आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंनाही खडे बोल सुनावले आहेत.
आजकाल मुंबईत सुपारीचा कार्यक्रम चालला आहे.
दिल्लीतून सुपारी दिली जाते, मग गोष्टी घडतात. ‘मातोश्री’च्या बाहेर वक्फ बोर्डाच्या मागणीसाठी असेच सुपारीबाज लोक आले होते. काहींनी पैसे देऊन आंदोलनासाठी या लोकांना पाठवले होते. वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक हे चर्चेसाठी आलेले नाही. अजून चर्चा झाली नाही, कुणाची मते कळली नाहीत. तेलगू देसमने विरोध केला आहे.
‘मातोश्री’च्या बाहेर गोंधळ करण्यात आला. त्यातले अर्धे लोक गुन्हेगार होते. ही सुपारी कुणाची होती मी तुम्हाला दाखवतो. जे १० ते १२ लोक ‘मातोश्री’च्या बाहेर घोषणा देत होते ते सगळे मुख्यमंत्र्यांचे लोक होते, असे म्हणत संजय राऊत यांनी फोटो दाखवून हा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री अब्दालीच्या सांगण्यावरून सुपारी देतात.
‘मातोश्री’वर जे लोक सुपारी देऊन धाडले गेले ते ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात किंवा ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी असतात. अकबर सय्यद आंदोलन करत होता. तो मुख्यमंत्र्यांबरोबर आहे बघा. सलमान शेख हा कुणाबरोबर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर. त्यानंतर सिद्दीकी नावाचा माणूस हा पण एकनाथ शिंदेंसोबत असतो. इलियास शेख ‘मातोश्री’बाहेर घोषणा देत होता.