23.8 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeसंपादकीयमान्सूनचे शुभागमन!

मान्सूनचे शुभागमन!

नैऋत्य मोसमी वा-यांनी महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. रविवारी पुणे, मुंबईसह मराठवाड्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. केरळमध्ये मान्सून ३० मे रोजी दाखल झाल्यानंतर ६ जून रोजी गोव्याचा उर्वरित भाग कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्रात दाखल झाला होता. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये मान्सूनने आपले अस्तित्व दाखवले. रविवारी राज्याच्या विविध भागात पाऊस झाला. १० ते १३ जून दरम्यान काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह ंमुसळधार पाऊस तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून रविवारी विभागातील ४५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३७ मंडळांचा समावेश आहे. गत दहा दिवसांत ५१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत. गत काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने नियमित हजेरी लावली आहे. सोमवारी लातूर शहरासह जिल्ह्यात कोरडे वातावरण होते परंतु सायंकाळी साडेसहानंतर पाऊस सुरू झाला. तो रात्री उशिरापर्यंत धो-धो बरसला. लातूरसह निलंगा, औसा, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर, अहमदपूर, उदगीर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. मानोलीत ओढ्यात एक महिला वाहून गेली.

मानवत तालुक्यातील मानोली शिवारात सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. पैकी एक महिला झाडाला अडकल्याने वाचली तर दुस-या महिलेचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. लातूर जिल्ह्यात रोजच पावसाचे बरसणे सुरू आहे. दिवसभर उन्हाची तीव्रता असते. सायंकाळी मात्र आकाशात ढग दाटून येतात आणि बघता बघता ढगाला कळ लागते. सोमवारीही रात्रभर पाऊस सुरू होता. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने निलंगा, औसा तालुक्यात ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. निलंगा तालुक्यात माकणी थोर आणि जळकोट तालुक्यात घोणसी येथे वीज पडून दोन म्हशी दगावल्या. परभणी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते तर काही भागात पाऊस झाला. बीड, हिंगोलीतही ब-याच भागात पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस झाला. रात्री ढगाळ वातावरण होते. ‘मिरगा’चा चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून ‘पावशा’चा पेर्ते व्हा.. पेर्ते व्हा असा संदेश मिळाल्याने शेतक-यांनी पेरणीची तयारी केली आहे.

काही भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पावशाचा संकेत लगेच ओळखतो. बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या साह्याने विविध संस्थांनी हवामानाचे किंवा पावसाचे अंदाज वर्तवले तरी त्यावर फारसा विश्वास न ठेवता सर्वसामान्य शेतकरी जुन्या पारंपरिक संकेतावरच अधिक विश्वास ठेवतो. निसर्गात होणा-या बदलांची सर्वप्रथम जाणीव प्राणी-पक्ष्यांना होते. त्या जाणिवेतूनच प्राणी-पक्ष्यांच्या हालचाली व स्वरात बदल होत असतात. या बदलांच्या संकेतावरून शेतकरीवर्ग मान्सूनचे आगमन कधी होईल याचा अंदाज बांधतो. त्यानुसार मृग नक्षत्रात शेतीची कामे वेग घेऊ लागतात. मृग नक्षत्रात लाल रंगाचे मखमली नाजूक किडे शेत शिवारात वावरू लागल्यावर पाऊस हमखास बरसणार अशी अटकळ शेतकरी बांधतो. अर्थात हे पारंपरिक अंदाज आहेत. अलिकडे वेधशाळांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार त्या-त्या तारखेला पावसाचे आगमन होत आहे.

सर्वसाधारपणे ७ जूनला सर्वदूर मृग नक्षत्राचा पाऊस होतो. गतवर्षी अंदाज वर्तवूनही ७ जूनला पाऊस बरसला नव्हता. नंतर काही दिवसांनी जोरदार बरसला होता मात्र, त्यानंतर सुमारे दोन आठवडे त्याने दडी मारली होती. यंदा मात्र पाऊस वेळेवर येईल असा अंदाज वेधशाळांनी वर्तवला होता आणि त्याप्रमाणे ३-४ जूनपासूनच महाराष्ट्रात काही भागात पावसाचे आगमन झाले. पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग भागात पहिल्याच पावसाने लोकांची दाणादाण उडवली. पुण्यात केवळ दोन तासांत ९० मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूरमध्येही वादळी वा-यासह पाऊस झाला. वेळेआधीच दाखल झालेल्या पावसामुळे यंदाचा संपूर्ण पावसाळा जोरदार असेल असा अंदाज बांधण्यास हरकत नाही. सुरुवातीच्या पावसानेच लोकांची दाणादाण उडत असेल तर प्रत्यक्ष आषाढातल्या पावसात काय परिस्थिती उद्भवेल याचाही अंदाज येऊ शकतो. वेळेआधी दाखल झालेल्या वरुणराजाचे स्वागत करताना लोकांचे अनाठायी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. महिनाभरापूर्वी राज्यात तापमान प्रचंड वाढले होते.

जवळपास सर्व धरणे कोरडीठाक पडली होती. मुंबईसारख्या महानगराला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये जेमतेम महिनाभर पुरेल इतकेच पाणी शिल्लक होते. ग्रामीण भागातील पाणीटंचाईबद्दल न बोललेलेच बरे? या भागात पाणी मिळवण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत. आता योग्य मुहूर्तावर पावसाचे आगमन झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात दूर होईल. शिवाय जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ब-यापैकी मार्गी लागू शकेल. पावसाचे हे शुभागमन संपूर्ण वर्षासाठीसुद्धा शुभ संकेत देणारे ठरू शकेल. पुरेशा प्रमाणात पाऊस होणार असेल तर योग्य पद्धतीने पाण्याचा वापर करण्याची तयारी सरकारी यंत्रणांनी ठेवली पाहिजे. म्हणजेच पाऊस कमी झाला तरी संकटाचा सामना करावा लागतो आणि पाऊस जास्त झाला तरी संकटाचा सामना करावा लागतो! संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारा मान्सून यंदा वेळेआधीच दाखल झाला आहे म्हणून ‘हॅप्पी मान्सून’ असे म्हणूया!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR