नडेलांनी घेतली मोदींची भेट, भारतात एआय हब उभारणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. ही कंपनीची आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याद्वारे एआय हब उभारले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी १७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, एआयच्या बाबतीत जग भारताबद्दल आशावादी आहे. माझी सत्या नडेला यांच्याशी महत्त्वाची चर्चा झाली. भारत असा देश बनत आहे जिथे मायक्रोसॉफ्ट आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. भारतातील तरुण नवीन कल्पनांद्वारे जगात क्रांती करण्यासाठी एआयच्या शक्तीचा वापर करण्यासाठी मिळणा-या या संधीचा फायदा घेतील.
पंतप्रधान मोदी यांनी नडेला यांच्यातील यंदाची ही दुसरी भेट आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही या दोघांची भेट झाली होती. पंतप्रधानांच्या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मीडियावर पोस् करताना म्हटले की, आम्हाला एआय क्षेत्रात भारतासोबत काम करायचे आहे. भारताला एआय-फस्ट बनवण्यासाठी आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.
आशियातील सर्वांत
मोठी गुंतवणूक
सत्या नडेला यांनी एआय क्षेत्रात भारतात तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे. आता ही मायक्रोसॉफ्टची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळे भारताला प्रथम एआय बनण्यास मदत होईल, असे नडेला यांनी म्हटले.
















