मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून निघालेल्या फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने जोरदार धडक दिली. बुधवारी (१८ डिसेंबर) हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, फेरी बोटीला भगदाड पडले आणि समुद्राचे पाणी बोटीत शिरले.
परिणामी बोट बुडाली. या दुर्घटनेत बुधवारीच १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी आणखी एका बेपत्ता प्रवाशाचा मृतदेह आढळून आल्याने मृतकांचा आकडा १४ वर पोहोचला. आता हा आकडा आणखी वाढला आहे. कारण, आणखी एका बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोट दुर्घटनेनंतर सहा वर्षांचा एक मुलगा बेपत्ता होता. या सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात समुद्रात शनिवारी आढळून आला. मृतक मुलाचे नाव मोहम्मद जोहान अश्रफ पठाण असे असल्याची माहिती समोर येत आहे. मृतक सहा वर्षांचा हा मुलगा गोव्यातील निवासी होता. त्याचा मृतदेह नौदलाच्या पथकाला आढळून आला असून पोस्टमार्टेमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.