35.1 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत ६५ लाडक्या बहिणींची फसवणूक

मुंबईत ६५ लाडक्या बहिणींची फसवणूक

आयफोनसाठी २० लाखांचे कर्ज उचलले

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाने ६५ महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मुंबईच्या मानखुर्द परिसरात उघडकीस आला आहे. या महिलांकडून घेतलेल्या कागदपत्रांवरून संबंधित आरोपींनी एका खाजगी वित्त पुरवठा कंपनीत आयफोनसाठी अर्ज करून सुमारे २० लाखांच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला.
या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुमीत गायकवाड, राजू बोराडे, रोशन, दानिश आणि शाहरूख अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत कुर्ला येथील एका महिलेने तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका वित्तपुरवठा कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीत ६५ महिलांनी आयफोनसाठी अर्ज केला होता. अर्जानंतर त्यांना सुमारे २० लाखांचे कर्ज मंजूर झाले होते. मात्र कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचे नियमित हप्ते भरले नव्हते.

या महिलांची चौकशी करण्यात आली असता या कर्जाशी या महिलांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी दिलेली कागदपत्रे या टोळीने वापरल्याचेही उघड झाले. सुमीत आणि राजू यांनी या महिलांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेताना कागदपत्रे घेतली होती.

त्यावेळी त्यांना अंधेरी आणि कुर्ला येथील एका मोबाईल शॉपमध्ये आणले आणि आयफोन घेऊन त्यांचे फोटो काढण्यात आले होते. एक महिन्याचा लाडक्या बहिणीचा अडीच हजारांचा हप्ता रोखण्यात आला व त्यांना पुढील महिन्यात त्यांच्या बँक खात्यात पुढील हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते.

मात्र नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता बँक खात्यात आलाच नाही. सुमीत आणि राजूने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने या महिलांच्या कागदपत्रांवरून त्यांच्याच नावाने आयफोनसाठी सुमारे २० लाखांचे कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न करता कंपनीची फसवणूक करून ते पळून गेले. कर्जाचे हप्ते न आल्याने कंपनीने शहानिशा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR