लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात हडको कॉलनी, प्रभाग क्रमांक ११ मधील नागरीकांनी मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून सोमवारी लातूर महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढून आंदोलन केले. नागरीकांच्या घोषणांनी मनपाचा परिसर दणाणून गेला होता.
प्रभाग क्रमांक ११ हडको वसाहत एमआयडीसी येथील जनतेचा मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लातूर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संजय पाटील खंडापूरकर, बाबा कांबळे, विश्वास कांबळे, रामभाऊ राऊत, अमोल कांबळे, बालाजी महाराज, कसबे, केंद्रे व मोठया प्रमाणावर महिला उपस्थित होत्या. आंदोलनातील नागरीकांच्या हातातील बॅनरने लक्ष वेधले असून यात हडको वसाहती मध्ये गल्लो-गल्ली नाल्या तुंबल्या आहेत. टॅक्स भरला आमच्या बापानी, तुम्ही घेता गुत्तेदारांचे माल-पाणी, कधी देणार जनतेला स्वच्छ पाणी, मनपातील अधिकारी मॅनेज म्हणून हडको वसाहतीमधील ब्लॉक झाल्या ड्रेनेज, प्रभागातील जनता विकासापासून उपाशी महापालीकेचे अधिकारी तुपाशी, घरपट्टी, नळपट्टी वसूल करता दरवर्षी आमच्या विकासाकडे लक्ष द्या ना हो आयुक्त मिना मानसी, हडको वसाहतीमधील रस्त्याची झाली दैना नागरीक म्हणतात आमचा रस्ता का होईना, आमच्या रस्त्याकडे तात्काळ लक्ष द्या हो आयुक्त मानसी मिना असे फलक आंदोलकांच्या हातात झळकत होते.

