22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसंपादकीय विशेषमैफिल उदास झाली...

मैफिल उदास झाली…

चिठ्ठी आयी है…’, ‘जिए तो जिए कैसे’, ‘आदमी खिलौना है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’ यांसारख्या एकाहून एक सुपरहिट गाण्यांनी लाखो गीतरसिकांच्या मनावर ठसा उमटवणा-या पंकज उधास यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. गझलविश्वात आजवर ज्या महान गायकांनी आपल्या अवीट स्वरसाजाने मैफिली गाजवल्या त्यामध्ये पंकज उधास यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. याखेरीज पार्श्वगायनामध्येही त्यांनी आपल्या स्वतंत्र शैलीने वेगळे स्थान निर्माण केले. ‘हिरो’ चित्रपटातील ‘तू मेरा हिरो है’, ‘राम-लखन’ मधील ‘तेरा नाम लिया’ यांसारखी त्यांच्या आवाजातील गाणी ऐकताना आजही लाखो गीतरसिक तल्लीन होऊन जातात.

गझल हा काव्यप्रकार अलीकडील काळातील फ्युजनमध्ये पूर्वीइतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नसला तरी याची स्वत:ची एक शैली असून ती अवीट आहे. महाराष्ट्रात सुरेश भट, माधव ज्युलियन, भीमराव पांचाळे, इलाही जमादार यांसारख्या प्रतिभावंतांच्या गझला तुफान गाजल्या. हिंदी साहित्यातही गझलांवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. कविता असो वा गझल त्यातील गेयता, नादमयता ही गायकाने तितक्याच समर्पकपणाने सादर केल्यानंतर अधिक उंचीवर पोहोचते आणि त्यातून रसिकश्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. भारतीय गानसंगीताच्या समृद्ध परंपरेमध्ये अनेक महान गझलकारांनी आपले स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. या मांदियाळीतील एक असणा-या पंकज उधास यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षापासून गायकीच्या क्षेत्रामध्ये मुशाफिरी करणा-या पंकजजींनी ८०-९० च्या दशकात एकाहून एक सरस गीते, गझला, विराणी सादर करत लाखो रसिकश्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला.

सामान्यत: गीतगायकीच्या प्रांतातील गायकांनी असंख्य गाणी सादर केलेली असली तरी त्यांची विशिष्ट गाणी ही अजरामर ठरतात. पंकजजींच्या बाबतीत अशी अनेक गाणी त्यांनी आपल्या अवीट सुरावटींनी अजरामर केली. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ या चित्रपटामधील गीतकार आनंद बक्षी यांचे ‘चिठ्ठी आयी है’ हे पंकज उधास यांनी गायिलेले गीत आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत ऐकताना किती जणांचे डोळे पाणावून गेले असतील त्याची गणनाच करता येणार नाही. त्याकाळामध्ये आजच्याइतकी विदेशामध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणा-यांची संख्या मोठी नव्हती. गावाकडचा माणूसही आजच्याइतका मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये आलेला नव्हता. परंतु तरीही घरापासून दूर, सातासमुद्रापार गेलेल्या व्यक्तीच्या भावभावना या गीतातून आनंद बक्षींनी मांडल्या आणि पंकज उधास यांनी त्या गीतांना तितकाच दर्दभरा स्वरसाज देऊन हे गीत अजरामर केले. हे गाणे आजही जगभरात स्थायिक झालेले भारतीय असंख्य वेळा ऐकतात आणि पंकजजींच्या आवाजाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात. कोणत्याही गायकाच्या गायनशैलीचे, सादरीकरणाचे मूल्यमापन करताना रसिकांवर त्याची मोहिनी किती पडते आणि किती काळ राहते यावरून केले जाते. ते निकष लावले असता पंकज उधास यांनी गायिलेली गीते ही अद्वितीय ठरतात.

पंकज उधास यांच्या घरात सुरुवातीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे मोठे भाऊ मनहर उधास हे देखील प्रसिद्ध पार्श्वगायक होते. पंकजजी सुरुवातीला केवळ हौशी म्हणून गायचे; पण मनहर यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना गायनाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची, चालण्याची प्रेरणा दिली. ते विविध कार्यक्रमांना पंकजजींना घेऊन जायचे. भारत-चीन युद्धादरम्यान त्यांनी पहिल्यांदा ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे गायिले तेव्हा एका प्रेक्षकाने त्यांना ५१ रुपयांचे बक्षीस दिले. लोकांना हे गाणं इतकं आवडलं की अनेकांच्या अश्रंूचे बांध फुटले. यानंतर त्यांनी गझल गायनाच्या दुनियेत प्रवेश केला. १९८० मध्ये त्यांनी ‘आहट’ नावाचा पहिला अल्बम रिलीज केला. पहिला अल्बम लाँच होताच त्यांना बॉलिवूडमधून गाण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यांनी १९८१ मध्ये ‘तरन्नूम’ आणि १९८२ मध्ये ‘मेहफिल’ हे अल्बम लाँच केले. आपल्या कारकीर्दीत सुमारे ४० अल्बम पंकजजींच्या नावावर आहेत.

वस्तुत:, १९७२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कामना’ या चित्रपटातून त्यांची बॉलिवूडमधील पार्श्वगायनाची सुरुवात झाली. पण सुमार कथानक आणि दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रचंड अपयशी ठरला. त्यानंतर गझल गायक होण्याच्या उद्देशाने त्यांनी उर्दूचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी सुमारे दहा महिने टोरंटो रेडिओ आणि दूरदर्शनमध्ये गायन केले. या दरम्यान, त्यांनी एका कॅसेट कंपनीचे मालक मीरचंदानी यांची भेट घेतली आणि त्यांनी ‘आहट’मध्ये पंकजजींना पार्श्वगायनाची संधी दिली. हा अल्बम श्रोत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला. १९८६ साली प्रदर्शित झालेला ‘नाम’ हा चित्रपट पंकज उधास यांच्या सिनेकारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. ‘चिठ्ठी आयी है’खेरीज या चित्रपटातील जवळपास सर्वच गाणी सुपरहिट ठरली. या चित्रपटाच्या यशानंतर पंकज उधास यांना अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. गंगा जमुना सरस्वती, बहार आने तक, साजन, दिल आशना है, फिर तेरी कहानी याद आयी, ये दिल्लगी, मोहरा, मैं खिलाडी तू अनाडी, मजधार आणि ये है जलवा यांसारख्या चित्रपटांत त्यांनी गायिलेल्या गीतांना रसिकांनी मनमुराद पसंती दिली.

नव्वदीच्या दशकात सुपरहिट ठरलेल्या ‘साजन’मधील ‘जिए तो जिए कैसे’ या गाण्याची तर त्याकाळातील नवतरुणांनी अक्षरश: पारायणे केली. त्याकाळात दूरदर्शनचा प्रचार झालेला नव्हता. रेडिओ हे प्रभावी माध्यम होते. अशा काळात रेडिओवर पंकजजींनी गायिलेले हे गाणे अथवा अन्य गाणी लागली की, श्रोत्यांचे मनोविश्व एका वेगळ्या दुनियेत रमून जायचे. आजही महामार्गावरून जाणा-या, ढाब्यांवर थांबलेल्या ट्रकमध्ये कुठे ना कुठे ‘ना कजरे की धार’, ‘चिठ्ठी आयी है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’ यांसारखी पंकजजींची गाणी ऐकायला मिळतात. आजच्या भपकेबाज संगीतामुळे कानठळ्या बसणा-या गीतकल्लोळामध्ये पंकजजींसारख्या जादुई आवाजाच्या गायकाची उणीव प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या जाण्याने गझलांंची मैफिल पोरकी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– मानवेंद्र उपाध्याय,
कलासमीक्षक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR