जिंतूर : शहरातील बलसा रोड परिसरातील जमीर कॉलनी येथे दि. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भटक्या कुत्र्याने साडेतीन वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने चिमुकलीच्या चेहरा, काना जवळ लचका तोडला. गंभीर जखमी चिमुरडीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दुसरीकडे शहरात आजपर्यंत अनेक चिमुरड्यांचे कुत्र्यांनी लचके तोंडलेले असताना नगर परिषद मात्र कुंभकर्णी झोपेते आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जमीर कॉलनीत अलीशा फिरोज खान (वय साडेतीन वर्षे) ही बालिका आपल्या घरासमोर खेळत होती. याचवेळी परिसरात फिरत असलेल्या एका भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. हा हल्ला एवढा भयानक होता की, कुत्र्याने बालिकेच्या चेहरा, कानाजवळील लचका तोडला. त्यामुळे बालिकेच्या चेह-यावर खोल जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या भीषण हल्लयामुळे घाबरलेल्या बालिकेच्या ओरडण्याने परिसरातील नागरिक व युवकांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले. त्यानंतर जखमी बालिकेला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. उम्मेकुलसूम खाजा मजीद यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र जखमांचे स्वरूप गंभीर असल्याने पुढील विशेष उपचारासाठी बालिकेला परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर जमीर कॉलनीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रोजच त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक मैदाने, शाळांच्या परिसरासह विविध निवासी भागांत कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसून येतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर परिषद प्रशासन मात्र या प्रश्नावर मुग गिळून गप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
शहरात यापुर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक बालके गंभीर जखमी देखील झाली होती. काही काळ नगरपालिकेने कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मोहीम राबविली होती. परंतू त्यानंतर मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्याच घटना घडत असून मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. या कच-याच्या ढिगा-यातील अन्नाच्या शोधार्थ भटके कुत्रे व इतर जनावरे या ठिकाणी येतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांसह अन्य जनावरांमुळे लहान मुलांसह नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. न. प. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
















