लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व आरोग्यसेवेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक ८ मधील महालक्ष्मी मंदिर, गांधी चौक, लातूर येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार या आरोग्य शिबिरामध्ये महिला कॅन्सर पूर्व तपासणी, स्त्रीरोग तपासणी, पाळीचे आजार, गर्भाशयाचे आजार, पिशवीचे आजार तसेच रक्तदाब तपासणी यांसारख्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील तब्बल ३२० पेक्षा अधिक महिलांनी या शिबिराचा उत्स्फूर्त लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत मोफत वैद्यकीय मार्गदर्शन व मोफत औषधोपचार पुरवण्यात आले.
या प्रसंगी लातूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर अॅड. स्नेहल श्रीकांत उटगे, व्हीडीएफ स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे, मनपा सदस्या सानवी झिपरे, मनपा सदस्य अभिषेक पतंगे, मनपा सदस्या रिहानबेगम घंटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता पाटील, डॉ. साक्षी राजमाळे, डॉ. राजश्री गिते तसेच जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना आरोग्यविषयक तपासणी व मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना वेळेवर तपासणी आणि योग्य सल्ला मिळावा यासाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे, आशिष सदाकाळे, विलासराव देशमुख फाउंडेशन स्कूल ऑफ फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक ऐश्वर्या पाटील यांनी केले, तर शेवटी बालाजी झिपरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.















