लातूर : प्रतिनिधी
तब्बल ४ महिन्यांपुर्वी म्हणजेच २ एप्रिल २०२६ रोजी महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत लातूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत शहरातील गायब झालेले सर्व्हिस रोड आणि त्यावरील अतिक्रमणावर चर्चा होऊन रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्याचे आणि ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, ४ महिने होऊन गेली तरी रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे झाला नाही. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाची उच्चस्तरीय अधिका-यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यासंदर्भाने ‘एकमत’ने वृत्त मालिका सुरु केलेली आहे. त्याची दखल घेत महापौर आणि आयुक्तांनी दि. २ एप्रिल २०२६ रोजी महापालिकेत अधिका-यांची बैठक घेत रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करुन ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे टाऊन प्लॅनिंग विभागात एकच खळबळ उडाली होती. परंतु, २ महिने होऊन गेली तरी रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्वे नाही.
८ दिवसांत सर्व्हे पूर्ण होईल लातूर शहरातील रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करुन ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने टाऊन प्लॅनिंग विभागाला दिले होते. परंतु, ४ महिने झाले तरी सर्र्व्हे झाला नाही. याबाबत अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टाऊन प्लॅनिंग विभागातील कर्मचा-यांची बदली झाली आहे. जे कर्मचारी आहेत त्यांना परत सूचना दिली आहे. या आठवड्यात रिंग रोडवरील अतिक्रमणाचा सर्व्हे पूर्ण होईल.















