लातूर : प्रतिनिधी
नविन शैक्षणीक वर्षाला सुरूवात होऊन महिना उलटला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आले. केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा स्तरावर शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ८० टक्के प्रमाणे २ कोटी १२ लाख १५ हजार ७६० रूपयांचा निधी उपलब्ध झाला. तो तालुकास्तरावर वितरीतही झाला. एक-दोन गट शिक्षणाधिकारी यांनी २२ लाख ९७ हजार ४०० रूपये गणवेशाच्या बिलासाठी निधी शाळा व्यवस्थापनाच्या खात्यावर वर्गही केले. इतर गटशिक्षणाधिका-यांनी वेळेत निधी खर्च करण्यासाठी प्रक्रीया राबवली नसल्याने विद्यार्थ्याच्या मोफत गणवेशाचा तब्बल १५ ते २० दिवसांनी १ कोटी ८९ लाख १८ हजार ३६० रूपयांचा निधी शासनाने परत घेतला आहे. सदर निधी हा शासन नव्याने सुरू करत असलेल्या एसएनए स्पर्श प्रणालीद्वारे वितरीत करणार आहे. त्या निधीसाठी वेळ लागणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गणवेश शालेय समितीने पुरवठादारांच्याकडून उसणवारीवर खरेदी केले आहेत. सदर पुरवठादार आता पैशाची मागणी करत आसल्याने शालेय समितीची आडचण होत आहे.
लातूर जिल्हयात जिल्हा परिषदेच्या व मनपाच्या १२७७ शाळा, तसेच पीएमश्री शाळा मधील इयत्ता १ ली ते ८ वी सरसगट ८७ हजार २५७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शाळा व्यवस्थान समितीच्याकडून देण्यासाठी नविन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्यापूर्वी शासनाच्या समग्र शिक्षा मोफत पहिल्या गणवेशासाठी जिल्हा स्तरावर शिक्षण विभागाकडे ८० टक्के २ कोटी १२ लाख १५ हजार ७६० रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. तो निधी जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर ८ दिवस आगोदर वर्ग केला होता. शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्याच्या सुचना केल्या होत्या. यात शाळा व्यवस्थापन समितीने उधारीवर कापड खरेदी करून ते बचत गटाकडून शिवून घेऊन विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश दिले. सदर गणवेश खरेदी ही शालेय समितीने उधारीवर केली आहे.
गणवेशाचा निधी शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे जून अखेरपर्यंत वितरीत करण्यात येत होता. शासनाने यात बदल करत १ जुलै पासून एसएनए स्पर्श प्रणालीद्वारे निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला. ज्या पुरवठादारांनी बिले वेळेत सादर केली. त्या पुरवठादारांना २२ लाख ९७ हजार ४०० रूपये आदा करण्यात आले. तर उर्वरीत १ कोटी ८९ लाख १८ हजार ३६० रूपयांचा अखर्चित निधी शासनाने परत घेतला आहे. त्यामुळे जुलै महिण्यापासून गणवेश पुरवठा दारांची बिले थकली आहेत. शाळा सुरू होऊन महिना उलटला, त्यामुळे गणवेश पुरवठादार शालेय व्यवस्थापन समितीला गणवेशाच्या निधीची मागणी करत आहेत.
















