लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात गेल्यावर्षी दि. १५ जून रोजी तब्बल २६ टक्के पाणीसाठा होता. यंदा दि. १५ जून रोजी या धरणात केवळ २१.६२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा आजघडीला मांजरा धरणातील पाणीसाठा ५ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काळात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस नाही पडल्यास पाणीटंचाईला समोरे जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबल्याने धरणांतील पाणीसाठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पावसाअभावी राज्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. लातूर जिल्ह्यातील परिस्थितीही काही वेगळी नाही. लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी अतिश्य महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणातील जलसाठाही वेगाने कमी होत चालला आहे. जिल्ह्यातील २ मोठे, ८ मध्यम आणि १३५ लघू, असे एकुण १४५ प्रकल्पांत केवळ २०.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १३५ लघू प्रकल्पांमध्ये १४.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अल निनोच्या सावटामुळे खालावत चाललेल्या पाणीपातळीवरुन चिंता व्यक्त होत आहे.
लातूर जिल्हा हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असला तरी कोरोनानंतर या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत राहिाला. यामुळे पाणीपातळीही वाढलेली होती. परिणामी शेतक-यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येण्यास मदत झाली. परंतु, यावर्षी अर्धा जून महिना संपला तरी अद्यापही पावसाचे आगमन झालेले नाही. जिल्ह्यात वळवाचे पाऊस मोठे होतात. परंतु, यावर्षी तेही झाले नाहीत. मांजरा धरणात आजघडीला २१.८७ टक्के जलसाठा आहे. निम्न तेरणा धरणात ३९.०८ टक्के पाणीसाठा आहे.
गेल्या ८ दिवसांपुर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे मांजरा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली होती. ८ मध्यम प्रकलपांपैकी निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पाची पाळू खचल्याने मागील दोन वर्षांपासून त्या प्रकल्पात पाणी साठविण्यात येत नाही. हा प्रकल्प तळाला आहे. रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्प जोत्याखाली आहे. लातूर तालुक्यातील तावरजा, रेणापूर तालुक्यातील रेणापूर प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही जवळपास २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उदगीर तालुक्यातील तिरुमध्ये ५ टक्के, देवर्जनमध्ये ११.८९, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ मध्यम प्रकल्पात १५.३४ व घरणी मध्यम प्रकल्पात २७ टक्के जलसाठा आहे. १३५ लघू प्रकल्पांचा घसा मात्र कोरडा पडताना दिसत आहे. त्यामध्ये केवळ १४.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
















