मान्सून गायब!

देशात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. १५ जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या भागावर मोसमी ढगांचा अभाव दिसून आला. हवामान विभागाच्या मते ४ जून ते १५ जून दरम्यान देशात सरासरी ५३ मिमी पाऊस पडायला हवा होता. परंतु केवळ १९.२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे पावसाची ६४ टक्के तूट निर्माण झाली आहे. मोसमी पावसाच्या मंदावण्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १६ राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर मोसमी पाऊस महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपास थांबला आहे. ईशान्येकडील राज्यांमधून पुढे सरकल्यानंतर तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये थांबला आहे.

कोकणात आल्यानंतर थांबलेल्या मान्सूनमध्ये प्रगती होण्याची आशा असतानाच सॅटेलाईटने टिपलेल्या छायाचित्रांनी चिंता वाढवली आहे. उपग्रहाच्या फोटोमध्ये मान्सून भारतातून पूर्णपणे गायब झाल्यासारखे दिसत आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पावसाच्या गतीमध्ये मोठी घसरण झाली. १५ जून रोजी उपग्रहाने टिपलेल्या फोटोमध्ये ही परिस्थिती अधिकच स्पष्ट झाली. सक्रिय मान्सूनशी संबंधित असलेल्या ढगांचा मोठा थर दिसण्याऐवजी आकाश निरभ्र असल्याचे दिसत आहे. ढगांची मुख्य हालचाल हिमालय, ईशान्य भारत आणि इंडो-गंगेच्या खो-यात उत्तरेकडील भागांवर केंद्रित झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखाही कमकुवत आणि विखुरलेली दिसत आहे. मान्सून मंदावण्याचे मुख्य कारण समुद्रातील आर्द्रतेच्या कमतरतेचे नसून, जमिनीपासून काही किलोमीटरवर सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील संघर्षाचे आहे. या समस्येच्या केंद्रस्थानी पश्चिमेकडून वाहणारा वेगवान वायू प्रवाह आहे. उच्च वातावरणातील हा वेगाने वाहणारा हवेचा प्रवाह खूपच दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे पूर्वेकडून वाहणारा वेगवान वायू सक्रिय होण्यात अडथळा येत आहे.

हा वायू भारतातील मान्सूनचे चक्र टिकवून ठेवण्याचे काम करतो. पुढील दोन दिवसांच्या हवामान अंदाजानुसार बिहार, झारखंड, ओडिशा, प. बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी व कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. एल-निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याचा धोका वाढला आहे. एल-निनोचे नैसर्गिक संकट म्हणजे कमी पाऊस व भीषण दुष्काळाची चाहूल. मृग नक्षत्राचा पूर्वार्ध संपला तरी महाराष्ट्रात मान्सूनचा पत्ता नाही. ७ जूनचा मुहूर्तही मान्सूनने चुकवला. उष्णतेच्या लाटेत होरपळून निघणा-या महाराष्ट्रात पावसाचे आगमन न झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कर्नाटकातून सांगली, सोलापूरमार्गे मान्सून मराठवाडा-विदर्भात प्रवेश करेल असा अंदाज होता. परंतु तो चुकीचा ठरला. राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागात २६२६ लघु, २६४ मध्यम आणि १३८ मोठी धरणे व जलाशय आहेत. त्यांच्यात सरासरी २३ ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सरकारने धरणातील उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. शेती आणि औद्योगिक वापरासाठी धरणामधून अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता राज्य सरकारने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाई अधिक तीव्रतेने जाणवत आहे. ९१५ गावे आणि सुमारे अडीच हजार वाड्यांना ९९९ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील जलपातळी कमी झाल्याने मराठवाड्यावर दुष्काळछाया निर्माण झाली आहे. राज्यात अद्याप पाऊस सक्रिय झालेला नाही. तुरळक पाऊस झाला म्हणून पेरण्या करण्याची घाई करू नका अशा सूचना सरकारने शेतक-यांना दिल्या आहेत. अर्थात शेतक-यांना याची जाणीव असतेच. दोन-चार मोठे पाऊस झाल्याशिवाय तो पेरणी करण्यास धजावत नाही. यंदा मान्सूनने प्रारंभीच दडी मारल्याने पेरण्या तर सोडाच पण पूर्वतयारीचीही कुठे लगबग दिसत नाही. मान्सूनने भौगोलिकदृष्ट्या पुढे वाटचाल केली असली तरी प्रत्यक्ष पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिले आहे. हवामानतज्ज्ञ या स्थितीला मान्सून ब्रेक अथवा मान्सूनमधील तात्पुरता खंड असे संबोधत आहेत. हवामान अंदाजानुसार आठवड्याच्या उत्तरार्धात वातावरणातील झोतवा-यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची यंत्रणा पुन्हा सक्रिय होऊन पावसाच्या हालचालींना वेग मिळू शकतो.

तोपर्यंत आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते. आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. पावसाला सुरुवात होणे आवश्यक आहे. खरीप हंगामात भात, सोयाबीन, रताळी, बटाटे, भुईमूग यासह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. हवामान खाते पाऊस नक्की कधी, कुठे व किती पडेल ते अचूकपणे सांगत नाही, ते केवळ पावसाचा अंदाज वर्तवतात. सहसा ‘बेडूक’ वाहन असेल तर खूप पाऊस पडतो असे म्हणतात. यंदा ८ जूनला सुरू झालेल्या नक्षत्राचे वाहन बेडूक असूनदेखील पाऊस पडला नाही. हवामानखात्याने १५ तारखेपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल असे म्हटले होते. पण तसे झाले नाही. यंदा अधिक महिना आल्यामुळे आषाढ महिना उशिरा सुरू झाला. त्यामुळे पाऊस उशिरा सुरू होऊ शकतो. यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीच्या ९४ टक्के पडेल हा अंदाज खरा ठरेल असे दिसते. पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत. विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. चारा टंचाईमुळे जनावरांचे हाल होत आहेत. शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पावसाने दडी मारल्याने एकंदरीत परिस्थिती चिंताजनक आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news