नवी दिल्ली, इस्लामाबाद : वृत्तसंस्था
काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा भारत भयंकर सूड घेणार या भीतीपोटीच पाकिस्तानची गाळण उडाली आहे. पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानी लष्करात दुफळी माजली असून २५० लष्करी अधिका-यांसह ४५०० सैनिकांनी राजीनामे दिले असल्याचे वृत्त आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर गायब झाले आहेत. अनेक लष्करी अधिका-यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारकडे रेटा लावला असल्याचे कळते.
पाकिस्तानी सैन्य दलात सध्या दोन गट पडले आहेत. जनरल मुनीर यांनी स्वत:च्या फायद्याकरिता सैन्य दलाचा वापर केल्याचा आरोप एका गटाकडून होत आहे. वरिष्ठ लष्करी अधिका-यांच्या एका गटाने पत्र लिहून मुनीर यांच्यावर अनेक आक्षेप घेतले आहेत. मुनीर यांच्यामुळे पाकची अवस्था सध्या १९७१ सारखी झाली आहे. ते पदावर कायम राहिले तर १९७१ ची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे १९७१ च्या युद्धात भारताने पाकचे दोन तुकडे करून बांगला देशची निर्मिती केली होती.
मुनीर यांचा होणार मुशर्रफ : याह्या खान?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेली भूमिका बघता असीम मुनीर यांची अवस्थाही तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि याह्या खान यांच्यासारखीच होणार, अशीही चर्चा आहे. अयुब खान यांना पदच्युत करून याह्या खान यांनी सत्ता हाती घेतली. देशात मार्शल लॉ लागू केला. पण १९७१ मध्ये भारताकडून दारुण पराभव आणि पाकचे दोन तुकडे झाल्यानंतर याह्या खान यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही नवाज शरीफ यांची सत्ता उलथवत सूत्रे आपल्या हाती घेतली. पण नंतर त्यांना पाकमधून परागंदा व्हावे लागले. आता मुनीर यांचीही अशीच अवस्था होणार, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, सुमारे ४,५०० सैनिक आणि २५० अधिका-यांनी राजीनामे दिले असून अनेक राजकीय नेते, उद्योगपती, सैन्य अधिका-यांनी आपल्या कुटुंबीयांना आश्रयासाठी परदेशात पाठवल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.