केंटकी : वृत्तसंस्था
अमेरिकेतील केंटकी येथील लुईसव्हिल मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एक यूपीएस मालवाहू विमान कोसळले. हा अपघात इतका भयानक होता की, त्यामुळे परिसरात मोठी आग लागली आणि अनेक घरे जळून खाक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर आकाशात दिसणा-या दाट धुरामुळे संपूर्ण परिसर हादरला. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, त्यांनी मोठा आवाज ऐकला आणि नंतर आगीचा एक मोठा गोळा वर येताना दिसला. ही घटना लुईसव्हिल विमानतळाच्या दक्षिणेस असलेल्या फर्न व्हॅली रोड आणि ग्रेड लेनजवळ घडली, जिथे आग वेगाने पसरली.
लुईसव्हिलचे महापौर क्रेग ग्रीनबर्ग म्हणाले की, विमानात असलेले जेट इंधन हे अपघातामागील एक प्रमुख कारण होते. स्थानिक चॅनेलशी बोलताना ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार, विमानात अंदाजे २,८०,००० गॅलन इंधन होते. ही चिंतेची बाब आहे. ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले की, या इंधन साठ्यामुळे आग वेगाने वाढली आणि जवळच्या घरांमध्ये पसरली. यूपीएस युनायटेड पार्सल सर्व्हिसने पुष्टी केली आहे की, अपघातग्रस्त विमान त्यांचे होते आणि ते लुईसव्हिलहून होनोलुलुला प्रवास करत होते.

