शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात व त्यांच्या विविध मागण्यासाठी दि.११ एप्रिल शुक्रवार रोजी तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालय समोर शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष शिवाजीराव पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती संघटना शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय समोर शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात सरकारने शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, सोयाबीन प्रति क्विंटल ६ हजार हमी भाव द्यावे, कांद्याला प्रति क्विंटल ४ हजार हमी भाव द्यावे,जय जवान जय किसान साखर कारखाना येणा-या हंगामापर्यत सुरू करावा, तालुका ठिकाणी न्यायालय उभारावे,१३२ के व्ही विज केंद्र उभारण्यात यावे, या मागण्यांचा समावेश असून यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या प्रसंगी तहसीलदार गोविंद पेदेवाड,नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी सदर निवेदन स्वीकारले व वरिष्ठांकडे तात्काळ सादर करणार असे सांगितले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवाजी पेठे, तालुकाध्यक्ष गुडेराव चौसष्टे, प्रा प्रभाकर, चोचंडे, एल बी आवाळे,, तुकाराम कोकरे, राजू खांडेकर, संजय क्षीरसागर, विनोद कुंभार, बालाजी झटे, बबन साकोळकर, प्रकाश माकणे, गंगाधर साकोळकर सचिन म्हाके यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.