निर्मला सीतारामन नवव्यांदा बजेट सादर करणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. संसदेच्या इतिहासात प्रथमच यंदा रलिवारी बजेट सादर केले जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिस-या कालखंडातील दुसरा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नववा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री देशाचा लेखाजोखा सादर करतील. यावेळी सीतारामन यांचे विक्रमी बजेट असल्याने त्यांच्या या बजेटकडे देशाचे लक्ष असणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील लांबलेला व्यापारी करार, अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेली अस्थिरता या परिस्थितीत निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. मोदी सरकारच्या काळात नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम सीतारामन यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुस-यांदा सरकार स्थापन केले, तेव्हा निर्मला सीतारामन यांच्यावर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपविली होती. त्यानंतर २०२४ मध्येही एनडीए सरकारमध्ये अर्थमंत्रीच झाल्या. आतापर्यंत त्यांनी पूर्ण आणि अंतरिम असे एकूण ८ अर्थसंकल्प सीतारामन यांनी मांडले.
या अगोदर माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ९ वेळा आणि प्रणव मुखर्जी यांनी ८ वेळा अर्थसंकल्प मांडला होता. उद्या सीतारामन नवव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यावेळी सरकार कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मोठी पावले उचलू शकते, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फायदा होईल. तसेच व्यापा-यांनाही या अर्थसंकल्पात कराच्या दरात काही सवलत मिळेल आणि अर्थव्यवस्थेवरील कर्जाचा बोजा कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
पहिल्यांदाच रविवारी
सादर होणार बजेट
भारताच्या इतिहासात प्रथमच यंदाचे बजेट रविवारी (१ फेब्रुवारी) मांडले जाणार आहे. २०१७ पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जात असे. परंतु माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलून बजेट सादर करण्याचा दिवस १ फेब्रुवारी रोजी केला. तेव्हापासून १ फेब्रुवारी रोजीच संसदेत बजेट मांडले जाते.
नवीन कृषी कायदे आणणार
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतक-यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी संसदेत नवीन कृषी कायदे सादर केले जाणार असल्याची माहिती दिली. शेतक-यांच्या कष्टाशी, त्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या भविष्याशी छेडछाड करू नका, बनावट बियाणे, खते, कीटकनाशक विक्रीद्वारे फसवणूक केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांंनी सांगितले.

