नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दुस-या महायुद्धानंतरचे सर्वात भीषण आणि प्रदीर्घ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आता भारतीय कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. रशियन सैन्यात भरती झालेल्या २०२ भारतीयांपैकी तब्बल २६ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजूनही ५० भारतीय तरुण रशियाच्या युद्धभूमीवर मृत्यूशी झुंज देत असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२ भारतीय या युद्धामध्ये सहभागी झाले आहेत. त्यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच दोघांचे पार्थिव दिल्लीत आणले गेले होते. तर ७ भारतीय तरुण रशियन सीमेवरून बेपत्ता आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे ११९ भारतीयांची सुटका झाली असून ते घरी परतले आहेत. मात्र ५० भारतीय अद्याप रशियन सैन्यात आहेत
२०२३ च्या सुरुवातीपासून दक्षिण आशियाई तरुणांना रशियन सैन्यात ओढण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय झाले. जास्त पगार, रशियन नागरिकत्व आणि सुखी जीवनाचे आमिष दाखवून तरुणांना फसवले गेले. अनेक तरुण विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर रशियाला गेले होते, मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना रशियन सैन्यात सामील होण्यासाठी सक्ती करण्यात आली. केवळ रशियाच नाही, तर युक्रेनच्या इंटरनॅशनल लिजनमध्येही सुमारे १०० भारतीयांनी सहभाग घेतल्याचा अंदाज आहे. यामध्येही किमान दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही.
दरम्यान, युक्रेन युद्धाला आता ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रशियामध्ये मनुष्यबळाची मोठी टंचाई असल्याने ते आशियाई आणि आफ्रिकन तरुणांना भरती करत आहेत. शॅडी एजंट्स हे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या बेरोजगार तरुणांना टार्गेट करत आहेत.
















