मुंबई : एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाने टोक गाठले होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघींनी एकत्र प्रवास केला. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी -राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला दोघींनी हजेरी लावली होती. गुजरातच्या जामनगरमध्ये हा सोहळा होता. या सोहळ्याला जाताना मुंबई ते जामनगर असा प्रवास दोघींनी एकत्र केल्याचे सांगण्यात येत आहे.
अंबानींच्या घरी हा खास सोहळा होता. या सोहळ्याला जाताना रश्मी वहिनी-अमृता वहिनींनी एकत्र प्रवास केला. गेल्या पाच वर्षांत शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यातही ठाकरे-फडणवीस कुटुंबीयांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या सगळ्यात इंटरेस्टिंग घटना घडली आहे. अमृता फडणवीस आणि ठाकरे कुटुंबीयांनी एकाच विमानाने प्रवास केला.
खासगी विमानाने प्रवास
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनकरता जामनगरला जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या परिवाराने एकाच खाजगी विमानाने मुंबई ते जामनगर असा प्रवास केल्याची माहिती आहे. मुंबई ते जामनगर विमान प्रवासाने दोन्ही कुटुंब आपापसातील कटुता दूर करून जवळ आले आहेत का अशी चर्चा रंगू लागली आहे.